[ ५३७ ]
श्री.
मोर्तब
मुद.
श्रीमंत राजश्री राजेराव दादासाहेब व ता। राजश्री तात्यासाहेब स्वामीचे सेवेसीः--
विनंति सेवक बाबूराव गोपाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. महाराज कृपाळू होऊन प्रांत अंतरवेदींत जितके माहाल सरकारचे तालुक्याचे मोगलाईंतून आहेत त्या महालांची जिल्हेदारी व फौजदारी सेवकास सांगितली. ते आपण आपले रजावंदीनें कबूल करून सेवेसी विनंती पत्र लिहून दिल्हें ऐसे जेः- माहालचे बंदोबस्तास दोन हजार स्वार व दोन हजार बरकंदान ठेवून करारवाके जफरफ्त करूं. प्रा। फत्तेनगर व सियानेपुट व जलालाबाद व मेरेट व सिरधना वगैरे महालांत जैता वगैरे गुजराचा तसरुख आहे तो सोडवून, आपली ठाणी बसवून, आपली मुलुख करून, माली मामलतीचाआकार होईल तो व वनजारा, राहादारी, जैता खातो, तो व जाहागिरी रेजाबस्तनापूर वगैरे फौजदारी याकुल सोडऊन पैसा सिबंदीचे खर्चास देऊं. सिबंदी सरकारांत एकदाम महाल सेवकाचे सुपुर्द आहेत त्या माहालांत सिबंदी त्यासिवाय मागणार नाहीं. रात्रंदिवस सारे माहालांत गस्त करून गुजर अगर मवास इतराचा उपद्रव लागेल; त्यास सजा देऊन. निरोपद्रव माहाल आहेत, चोरी डाका मुसाफरास उपद्रव होईल, त्याची तदबीर करून, मालिक रजाचंद राखून, हरामजादियासी तंबी करूं. माहालकरीयांसी एक दाम मागणार नाहीं. फौजेचें पोट परभारें भरून सरकारचा दिवाण बकसी पौतदार राहील, त्यासी माली मामलतीचा इतला करार वाकै देऊं. माहालची तसदीस माहाराज चुकवितील तो पैसा कमाविसदारास ताकीद करून हजूर पावता होय तें करूं. माहालोमाहाली पायमाली अगर नुकसान न करूं. घास दाना न मागूं. फौजदारी माहाराज नेमून देतील ते घेऊं. कोणाची नालीस हजूर येऊं देणार नाही. सरकारचा नक्ष उत्तम प्रकारां राखूं. सेवेसी श्रुत होय कृपा केली पाहिजे. हे विज्ञापना.