[ ५३० ]
श्री.
राजेश्रियाविराजित राजश्री नारो हरी स्वामी गोसांवी यांसी :-
सेवक बापूजी माहादेव सां॥ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जाणें. विशेष. तात्यांचा काळ जाला हें चिरंजीव दामोदरजींनी लिहिलें त्यावरून परम खेद जाला. ईश्वरें मोठें वाईट केलें ! बरें ! ते पुण्यवान होते. तुह्मी सहसा खेद न करणें. तुह्मांस तात्यांचे स्थळी तीर्थरूप राजश्री भाऊ आहेत. कोणे गोष्टीची फिकीर न करणें. तुह्मी सुज्ञ आहां. लेहावें ऐसें नाहीं. त्यामागें हिंमत धरून पराक्रम करणें. तुह्मी करालच. हा आह्मांस पूर्ण भर्वसा आहे. तुमचें कामकाज असेल तें लिहीत जाणें. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति.