[ ५२७ ]
श्रीवरद.
पौ छ ७ रबिलावल.
तीर्थस्वरूप राजश्री बापूसाहेब व राजश्री दादासाहेब वडिलाचे सेवेसीः----
बालकें पुरुषोत्तमानें व दिवाकरानें कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील क्षेम ता। छ ३ रा॥वल मुकाम नजिक शिकारपूर जाणोन खानदोत्सवलेखन करीत गेलें पाहिजे. यानंतरः वडिलीं पत्र छ २७ चें पाठविलें तें छ २ मिनहूस पावलें. लेखनार्थ कळला. लिहिलें कीं-- तुह्मांस इतके दिवस जाले हा काळ रुपया एक न आला; आह्मी त्रिंबक गोजरोवर वरात केली ह्मणून त्याजवर इतराजी करून मसाला केला. ह्मणून लिहिलें त्यास, आह्मीं तों त्रिंबक गोजरोस इतकेंच लिहिलें होतें की, जलालाबादेचा ऐवज दिल्लीस पोंहचावणें; आणि ताकीद केली कीं तहशिलेंत सुस्ती केलिया कार्यास येणार नाहीं. त्यावरून त्या मादरचेदानें आपणांस लिहिलें कीं, मसाला केला, ह्मणून लिहिलें. असो ! त्याचेंच लिहिणें सत्य झाले ! उगीच शिबंदी ठेऊन, दोन हजार रुपये रोजिना खर्च करून, कमाविसदारापासून रुपये घेऊन शिबंदी खर्च करिता येथे एक रुपया न द्यावा, हे ताकीद करितां, याचें नाव काय ? ह्मणून लिहिलें; तर उगेच बसून शिबंदी खर्च करावी, ऐसी हौस नाहीं. मुलकांत अमल खांद्यावर धोत्र घालून तपश्चर्येने अमंल होतो, यांत संदेह नाही. परंतु या गोष्टीस तपश्चर्याशील कृष्णाजी केशव आहे तो अमल करील. आमचेनें होत नाहीं. व लिहिलें की -- बखेडा न कराल, व माणसांस बराबर ठेवाल, सुरळितपणें काम कराल तर करणें, नाहींतर इजारदारा पाठवूं, व रुपया ठिकाणीं लावूं, नाहीतर विसा लक्षांस आह्मी बुडतों. उद्या लोक ह्मणतील कीं, पोराचे भरंवसियावर घरच बुडविलें. जनांत तोंड दाखवायास जागा राहणार नाही. जैसे अंताजी पंतांसीं मिळोन घर बुडविलें त्याप्रों।च हें लक्षण दिसतें. ह्मणून कितेक प्रकारें कृपामृतवर्षाव करून लिहिलें त्यास, आतां आपण सुखनैव चित्तास येईल त्यास पाठवावें. आजपावेतों लोकांचे भरंवलियावर नवतों. व पुढेंहि श्रीकृपेनें व तीर्थरूप केलामवासीचे पुण्येंकरून लोकांचे भरंवसियावर नाहीं. व अंताजीपंतासी मिळून घर बुडविलें नसतां आह्मांवर निमित्त आलें. बरें ! आह्मी घर बुडविलें ! लोकानें तारलें ! पुढेंहि. बुडवायास आह्मी आहों ! यास्तव, ज्या सोन्यानें, कान तुटे तें कशाप्त ठेवावें ? व जेव्हां ठेविलें तेव्हांहि कोणी चालवीत नवता. व आतांहि कोणी चालवावें या उमेदीवर नाहीं. सर्वस्वी पदरी तीर्थरूप भाऊसाहेबांचें पुण्य आहे. सर्वांची श्रीमहालक्ष्मी आहे. ईश्वराचा मुलुख कांहीं उणा नाही, व आमचा पाय कांहीं लंगडा नाहीं. ईश्वरास सर्वांची चिंत्ता आहे. व लिहिलें कीं- येथून आज्ञा येईल त्याप्रों। वर्तणुक करित जाणें ; आज्ञेखेरीज वर्तिलां कार्यास येणार नाहीं; वरात तनखा करूं ते मानीत जावी; इतक्या गोष्टी पुरवत असल्या तर काम करणें. ह्मणून लिहिलें त्यास, आह्मी कांहीं चाकरी कबूल केली नाहीं, व ऐसे चाकरी करून ऐसी कृपा संपादावी याजपेक्षां दुसर्याचीच चाकरी करावी हें उत्तम. व लिहिलें कीं, खरीप एक महिना राहिलें होतें. ते वेळें आह्मी आलों. अगोधर माजुलअमीलांनी खरीफ घेऊन गेले. माहालोमाहाल शंभर प्यादे ठेवून अमल करितील, ऐसे विलायेतचे अमल असतील ते करतील; आमच्यानें होत नाहीं ! सुखेनैव ज्यास पाठवणें त्यास पाठवावें. अगोधर कांहीं अर्जुवंद नवतों व पुढेंहि आह्मी होत नाहीं. आह्मी बहुत परिहार ल्याहावा तो कोठवर ल्याहावा ? तेथें चुगलखोर रात्रदिवस सांगतच असतील. बरें ! श्रीकृपा करणार समर्थ आहे ! वरकड कितेक प्रगण्याचा अहवाल वेगळ्या पुरवणी लिहिला आहे त्याजवरून कळेल. कृपा केली पाहिजे हे. विनंति.
मामांनी लिहावें. रा॥ त्रिंबक गोजरोंनी शिबंदी ठेवायासी पत्रें पाठविलें तें बजिनस सेवेसी पाठविली आहेत. चाकराचा आब व चुगलखोरी या प्रकारची; व आपली त्या पाजीकरतां आह्मांवर इतराजी ! बरें, असो ! बहुत काय लिहिणें ? ही विज्ञप्ति.