[ ५२६ ]
श्रीगजानन.
पो। छ ६ रबिलावल
सेवेसी बालकें पुरुषोत्तमानें व दिवाकरानें कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता। छ ६ रबिलावल मुकाम हरणावा जाणोन स्वानंदोत्सव लेखनआज्ञा करित गेलें पाहिजे. यानंतर पूर्वी पत्र पाठविलें आहे त्याजवरून सर्व वृत्त ध्यानास येईल. त्यास, ऐसें न होये कीं, नवाब वजिर यांसी बोलावून घेत. अगोधर आलेच नसते तर्हे बरें होते. आतां उठून गेले तर, फौजेचा भ्रम उठतो. यास्तव नवाबाचें ताकीदपत्र यांसी एक पाठवावें कीं तुह्मांस त्यांचे ताबीन करून पाठविलें आहे कीं, ते ज्या प्रों। सांगतील त्याप्रों। करणें. तें तो नाहीं ; मधेंच फितुर करूं लागलेत हें काय ? आतां ज्याप्रों। ते सांगतील त्याप्रमाणें करीत जाणें; फितुर केलिया कार्यास येणार नाही. याप्रों। ताकीद्रपत्र पाठवावें. व दोन चौक्या पाठवून द्याव्या की--- आपल्या ताबीन राहेत; त्यांचे ताबीन आहेत, त्या आपले कामाच्या नाहीत. व यांनी तो साहु फितुर आरंभिला आहे. उबेदुल्लाखान येतांच, त्यानें गुलामाचे दिवाणास बोलावून वचनप्रमाण, आणभाष केली कीं — आह्मी तुजला वांचवून तुझा गड तुला भाल ठेवितों व तुझी मुलाजमत करवितों. त्याजवरून आह्मी तों रात्रंदिवस तेथील बारदारी करितों, व चौकीस लोक पाठवितों. श्रीकृपेने तो बाहेर निघतांच त्यास ठिकाणी लावितों. ऐसे करितां तो निघून तिकडे आला तर, आपण नवाबासी ठीक करून, कांहीं देऊ घेऊ करून तो गुलाम तेथें येतांच त्यास मारून टाकीत, याप्रों। जरूर करावें. आह्मीहि माहालेमाहाल शिड्यां वगैरे सरंजाम आणविला आहे. तो येतांच श्रीकृपेनें एक्या हुल्यांत गड खाली करून घेतों या गोष्टीचा बंदोबस्त नवाबापासीं जरूर करावा. विशेष काय लिहिणें ? या गोष्टीची त्वरा करावी. विलंब केलिया सिबंदीची तदबरी होते, यास्तव त्वरा करावी. कृपा केली पाहिजे. हे विज्ञापना.
रा॥ त्रिंबकपंत स्वामीस नमस्कार विनंति उपर. तीर्थस्वरूप साहेबांस लिहिलें आहे त्यावरून सर्व कळेल. त्वरा करावी. यांनी फितुर आरंभिला आहे. त्वरा करावी, व तेथील बंदोबस्त करावा की गुलाम येतांच त्यास ठिकाणीं लावीत. हे विनंति.