[ ५२२ ]
श्री.
+ + + येतां तर रुपये वसूल होते. फौजा लांब राहिल्या. लोकांस दबाव कोणाचा नाहीं. ऐसे आहे. पूर्वी एक किस्त जाली. त्याशिवाय रुपया एक आला नाही. सांप्रतकाळीं एक्या किस्तीची तरतूद करविली आहे. याप्रकारें वर्तमान आहे. नुसते कागद काळे करून नवाबानें दिल्हे आहेत. परंतु रुपये वसूल होणें कठिण आहे. विना आपली फौज या प्रांतीं पांच सात हजार आलियाखेरीज जेथें जेथें तनखे आहेत तेथील वसूल होणें संकट आहे. आपली फौज आलियानें रुपया वसुलांत येईल. नवाबाचा या मुलकांत जप्त किमपि नाहीं. प्रताप नारायण या प्रांती येणार. त्यास दरमियान जमीदारांचा बागडा ! पांच हजार फौज त्याची निभणें कठिण ! ऐसा बंदोबस्त यवनाचा आहे. आपल्या फौजेची दहशत या लोकांस आहे. गाजीपूर व काशी वगैरे येथील वर्तमान एकच आहे. काशीचा पैसा मात्र खरा. त्यामध्यें बलवंडसिंगाशीं गांठ आहे ! दरमियान यवनाचीं पत्रें येत आहेत, की रुपये सत्वर वसूल करून सरकारांत पाठवावे. ऐशी अंतस्ते पत्रें सर्व जमीदारांस येत आहेत. आणि आह्मांसहि तनखे दिल्हे आहेत. जमीदारांनीं आह्मांस रुपये द्यावे कीं नवाबास पाठवावे ? त्यास, जमीदार दोन्ही गोष्टी करीत नाहीत. नवाबासहि पैसा पाठवीत नाहीत आणि आह्मांसहि पैसा देत नाहीत. धातुपोषणाच्या गोष्टी सांगताहेत. आह्मी आपल्या बळें पैसा घ्यावा, त्यास, जमियत जे आहे ते तुह्मांस विदित आहे. अजमगडच्या तनख्याऐवजी रुपये प्रताप नारायणानें वसूल चाळीस हजार केले. व येथें हादियारखान आहे, त्यानें रुपये बत्तीस हजार वसूल केले. ऐसें आहे. हादियारखानास तुह्मीं परवाना पूर्वी नवाबाचा पाठविला कीं, जो रुपया वसूल केला तो माघारे देणें. त्यास, तो रुपया देतो, ऐसा अर्थ नाहीं. कजिया करावा, इतका मात्र त्यास रुपयाविषयीं तगादा लावायासी आळस न केला. परंतु रुपया देत नाहीं. येणेंप्रमाणे वर्तमान आहे. विशेष काय लिहिणें? माहालच्या तनख्याविषयी लिहिलें. त्यास, दोन चार स्थळें मिळून कांहीं रुपया वसूल होईल. याजसाठी वारंवार लिहिलें जात आहे. हे विज्ञापना.