[ ५२० ]
श्री.
विज्ञापना विशेष. आपांची स्वारी निराळी करून पाठविली आहे. त्याजबा। फडणीस, पोतनीस, जामदारखाना मोगसाईहून रवाना केलें आहे. अगोधर, आपाजी गोविंद, बिनीवालेकडील बिनी करितात, त्यांसच फौजा समागमें देऊन पाठवावयाचा निश्चय होता. फौजा नेमिल्या; तमाम सरदारांस बोलावून आणून, रुबरु सांगितलें. रुबरु कांहीं नाहीं, न करी, ह्मटलें नाही. बिराडास गेल्यानंतर साफ सांगोन पाठविलें जे, आह्मांस जावयासी अनकूल पडत नाही. सर्वाजी गोडे, दारकोजी निंबाळकर, यांणीं साफच सांगून पाठविलें जे, आह्मी जात नाहीं. तेव्हां वेडेवांकडें पुष्कळ बोलून पागा हिरोन आणीन, लुटून टाकीन, ऐशीं भयवाक्यें करून बोलिले. त्याजवरून, दोघे फौजसुद्धां तयार जिनबंदी करून राहिले होते. त्यांचें कांहीं जालें नाहीं. चांदाजी शितोळे यांनीही सांगोन प्रहर रात्री पाठविलें जे, आह्मी कांहीं जात नाहीं. जमाव भांडका, ऐसें जाणोन, त्याजवर चौकी खिजमतगारांची पाठविली. गाडदी तयार करविले. हल्ला करावयाचें केलें. इतकियांत हें वर्तमान सर्वत्रांस कळल्यानंतर तमाम उजवी बाजू जिनबंदी करून तयार जाली. आपास सखोजी जखताप, व सखाराम हरी, व कृष्णांजी रणदिवे, ऐसे येऊन बहुत प्रकारें सांगितलें. न ऐकत, तेव्हां एकांतीं उठोन नेले. सखोजी जखताप यांनी साफ सांगितलें जे, त्याजवर हल्ला केल्यानें पाच हजार फौज तयार जाली आहे, त्याजबरोबर उभे राहतील तेव्हां ठीक पडणार नाहीं, आतां आटोपावें, रदबदली ऐकावी. मग ऐकोन, चौकी उठवून आणली. दुसरे दिवशीं रा॥ आपास नेमून त्याजबरोबर फौजा देवून रवानगी केली. त्याजबरोबर जावयासी कांहींच कोणी ह्मटलें नाहीं; उठोन गेले. ऐसें जालें. झुंजाचे अलीकडे क्रुरता फारच धरली आहे. नित्य एक दोन हात तोडितात; डोकी मारितात. रदबदली कोणाचीही चालत नाही. जे करतील तें प्रमाण. दर्द कोणाची नाहीं. इजत जतन होऊन पुणियास येईल तो प्रालब्धाचा जाणावा. स्वामीचे प्रतापेंकरून आमचें कामकाज यथास्थित चालत आहे. रा॥ वामनराव व आनंदराव रास्ते यांस पत्रें जरूर कारकुनी दुसाला द्यावयाविसीं पाठवावीं. राजश्री मामासहि एक पत्र, जखम लागली सबब, समाधानाचें लिहावें. आमच्या हरएक कानूकैदेविसीं, कारकुनीविसीं तावन्मात्र सुचवावें. विशेष काय लिहिणें ! ही विज्ञप्ति.