[ ५१४ ]
श्री.
तीर्थरूप रा। दादा वडिलांचे सेवसीः--
आपत्य पुरुषोत्तमानें साष्टांग नमस्कार विनंति कीं, -- काल छ ८ मोहरमी सविस्तर वृत्त सेवेसी लिहिलें आहे. श्रीमंतांस निवेदन केलेच असेल. आजचे नवलविशेष हेच की, पूर्वी पातशाहाचे मातुःश्रीने खानखानाचे विद्यमानें सलुखाचा डौल केलाच होता. त्याउपरि, मीरबक्षीनें खानखानास खरें करून, आपलें लगामीं लाविले, व सलुख करूं लागले. याउपरि मीरबक्षीस, रोहिलियास लढाईचे पल्यावर पातशाहासहित आणून सा लक्ष रुपये देऊ केले, व लडाई ठैरली. आज एकाएकीच खबर आली की, खानखानाचे विद्यमानें सफदरजंगास सुबे अयुद्धेचा खिलत पोहोंचला. त्यानें बलमगडसंनिध येऊन फर्मान बाडी उभी करून फर्मान खिलत घेतला. हें वृत्त ऐकिलिल्यावर पातशहास अर्ज केला की, काल काय ठैराविलें व आज काय केलें ? त्यानें शफत जे वाहावी ते वाहिली की, मजला कोणाचें भय कीं गुप्त पाठवूं ? त्यानें जैसें एका गुलामास तक्तावर बैसविले, तैसें आपणच सोंग करून, शोहरत देऊन, पळावयाची विद्या केली असेल; नाहींतर, वाटेंत जमेदार मारतील यास्तव हें कर्म केलें असेल; आह्मी युद्धास तयार आहों. याप्रो। शपथपूर्वक सांगितलेयावर, अकबतमहमूद आह्मांस ह्मणूं लागला की, खानखाना आह्मांस तुह्मांस खता देऊन आपण सलुख करील; तैसेंच जालें ; तुमचे खाविंदाचे भरवशियावर आमचेंच नुकसान तुह्मी केलें. अतः पर उदईक रोहिले व बक्षी उठोन येऊन किल्यापासीं धरणें बसणार, व तलब घेणार, ह्मणून सांगितले. मुख्य गोष्ट हेच की, सफदरजंगास खिलत अयुधाचा खानखानानें पोहचविला. पातशाहा तो शफथ वाहतात की, आह्मीं पाठविला नाहीं. उदईक सफदरजंग कुच करून सुभियाकडे जाणार ह्मणून वार्ता आहे. अमलांत येईल तें लिहूं. पातशाहाचे मातुश्रीने मीरबक्षीसवें रोहिलियासी आह्मांकडून लढाईचे पल्यावर आणून, गुप्तरूपें खानखानाचे हवाला खिलत सुवियाचा केलासा वाटतो. स्पष्ट कळेल तेव्हां सो। लिहूं. कां कीं, मीरबक्षीसहि अयुधेचा खिलत अकबतमहमुदाचे हवाला केला आहे. व सा लक्षांचे निमे तीन लक्ष रुपयेहि बकशीस भांडीकुंडी मिळून दिधले; आणीख तीन लाख मिळतील तेव्हां हे युद्धास प्रवर्ततील, अथवा शिबंदी चुकवून घरी येतील. जें होईल ते लिहूं. आह्मीं लडाई करावयाचाच उद्योग करवितों. सफदरजंग मित्रभंग करून पळून जाणारसें वाटतें. अमलांत येईल तें खरें. जाट सुरजमल रोहिलियांचे पायदळ ठेवित आहे. मजहला तमाशाचाच दिसतो. आपली भारी फौज सत्वर येती तर उत्तम होतें. लडाई आठ महिने थांबविली; कोठवर बुद्धिबल चालेल ? विनारुपया सोंग रुपयाचें होत नाहीं. श्रीइच्छाप्रों। जें होणार तें हो ! आह्मी अझूनहि सफदरजंग पळाला तर्ही पिच्छा करावयाचा उदेग करितों. होतां होईल तें खरें. भेट होईल तो सुदिन ! कृपा केली पाहिजे. हे विनंति. आमची अकबराबादेची सनद फौजेचे नेमणुकेची नुस्ता कागद घ्यावयासी खावंद अनमान करितात; पुढे उमेद काय ? बरें ! महिनतीचें सार्थक करणार खाविंद समर्थ आहेत ! जाट मरेल तेव्हां अकबराबादेंत पाच हजार स्वार त्या ऐवजी खर्च मिळेल. बरें ! श्री इच्छा प्रमाण ! हे विनंति.
चिरंजीव तात्यास आशीर्वाद. राजश्री त्रिंबकपंतांस नमस्कार उपरि. राजश्री गंगोबातात्यास व राजश्री सखारामपंतांस पैदरपै पत्रें पाठविलीं, व नेमणुके विशईंहि लिहिलें; परंतु उत्तरहि न पाठविलें. याचें कारण काय ? तें लिहिणें. सा। नमस्कार सांगणें.