[ ५१३ ]
श्री.
श्रीमत् राजश्री उभयतां साहेबांचे सेवेस:-
आज्ञाधारकाचा कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ता। छ २१ माहे जमादिलाखर पावेतों जाणून स्वकीय कुशल लेखनाज्ञा करीत असलें पाहिजे. विशेष. आपण कृपा करून नथु हरकार्याबराबर पत्र पाठविलें तें पावलें. बहुत हर्ष जाले व सविस्तर वर्तमान कळलें. इकडील वर्तमान तर सेवेस येऊन लिहिलेप्रों। हजर आहे. परंतु येथें सल + + + + + रंग बरा नाहीं कीं, पातशाहीमध्यें अबदुल अहतखां व नजबखान सरदार त्यामध्यें चित्तशुद्धता नाहीं. जैसें हिसामुद्दीखान नजबखानाचे पाठेस लागला होता, तैसें अबदुल अहदखां नजबखानाचे पाठीस लागला आहे. परंतु थोडक्या दिसांत अबदुल अहदखानहिठिकाणें लागतो. पहिलें, अबदुल अहदखानास लोक भला ह्मणत होते; परंतु आतां सारे जण बुरा ह्मणतेत; कोण्ही भला ह्मणत नाहीं. व आह्मीहि अबदुल अहदखानासी उमेद ठेवित होतों की, हा आरसियांत कारभारांत येईल, तर आमचे कामें करून देईल. परंतु हा मादरचोद कश्मिरी असा हरामजादा कीं, बोलणेंहि टाकिलें. आपलें गाव दुसरेयासी देणें चाहातो. आह्मांस दस्तक गांवचे करून देत नाहीं. हरामजादगी करतो. यापेक्षा हिसामुद्दीखानच बरा होता. बरें ! असो ! हाहि ठिकाणीं लागतो. कांहीं चिंता नाहीं. ईश्वर आपल्यास सलामत राखो ! सर्व उत्तमच होतील. दुसरें :-- येथें खर्चाचीहि टंचाई आहे. गावची हे शकल ! व करोडचे दरमाईचाहि कांहीं ठीक नाहीं. व येथें हवेलीचे मरामतेस दीडशें रुपये लागले. हवेलीची ज्या ठिकाणें जरूर मरमत करणें होतें, तेथें केली आहे. कळावें. दुसरें:- येथें या सरदारानें रामरावसारखे वकील पाठवून वकालतीचें ऐसें स्वरूप गमाविलें कीं, स्वरूप वकालतीचें न राहिलें. येथें ते ऐसे असतात की, पेशव्यांच्या वकालतीचा माणूस दाहादाहा वीसवीस रुपये मागत फिरतो. त्यास, विनंति की, येथें विकालीतमधें जो कोणी शंभर रुपये दरमाहा चाहे तो येथें मिळणार नाहीं. याकरितां ईश्वरकृपेनें आपण जों इकडे यावें तों आपलें सर्व खायाची बेगमी बंदूबस्त पक्के करून येणें. येथील भरंवसा कांहींच न ठेवणें. जर आपण मेरट वगैरे माहाल हजुरांतून करून इकडे याल तर बहुत उत्तम आहे. व आपले सर्व गोष्टीचें स्वरूप व विकालत सुजादौलचे जाबसाल हजुरांत करून येणें कीं, दिल्लीचा रंग आपणांस ठाऊका आहे.