[ ५०७ ]
श्री.
विनंति उपरि. काल संध्याकालपर्यंत जाहला मजकुर, सविस्तर, राजश्री गोविंदपंत तात्या पोंहचल्यावरी, अवगत जाहलाच असेल. जी याद नानासाहेबांजवळून कबूल करून घ्यावयासाठी कलमवार लिहून ठेविली होती, तिजवर नानासाहेबांचे दादासाहेबांचें बोलणें होऊन रात्रीस कबूल करून घेतले. गोपाळराव यांचे मजकुरासी मात्र मळमळीत आहे. आजी प्रातःकाळीं प्रहर दिवसाउपरि थोरले श्रीमंत बागांत सैर करावयास गेले. दादासाहेबी सारे हुजुरचे मुत्सद्दियांस बोलावून ताकीद केलीः-- मजला कळल्याखेरीज कांहीं न करावें. पवारांची व सिंद्यांची जप्ती उठविली; पत्रें दिल्हीं, जिवाबाई सिंदी यांचे कारभारियास बोलाव पाठविलें आहे. याउपरि रंग काय पडतो ? कारभार कसा होतो ? तो सर्व दिसेल मजकुर तसा लेहून पाठवूं. बहुत काय लिहिणें ! हे विनंति. रवाना बुधवार दोन प्रहर दिवस.