[ ५०३ ]
श्री.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गंगाधरपंत तात्या स्वामी गोसावी यासी:------
पोष्य त्रिंबकराव सदाशिव नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेष. श्रीमंताचीं पत्रें राजश्री सुबेदारास व तुह्मांस आलें; तेंच पत्रें पाठविली आहेत, त्यावरून सर्व कळेल. तुमचें पत्र आहे, त्यांत मजकूर फार कठिण अक्षरें लिहिला; समयें पाहून, विचार ध्यानांत आणून लिहिला. असो. खावंद थोर आहेत. परंतु सेवक लोकांनीं उचित अर्थ ध्यानांत आणून प्रसंगानरूप वर्तावें. या पत्रांतील मजकूर सुभेदारास कळलियास चित्तांत बहुत श्रमी होतील. याकरितां तुह्मी, पत्रांतील भाव लिहिल्याअन्वयें नच सांगणे. जे गोष्टीनें सुभेदार खटे ने होत तें करावें. सुभेदाराचे मर्जीचा प्रकार तुह्मी जाणतच आहां. पत्रांताल मजकूर कळलियास, सुभेदार खटे होऊन मोठे दुःखी होतील; याकरितां नच सांगणें. याप्रमाणें आह्मांस सुचलें तें लिहिले आहे. तुह्मीहि उचित तेंच कराल. सर्व मदार सुभेदारावर आहे. ते सर्वथा खटे नसावे. आह्मी श्रीमंताजवळ गेलियावर त्यासी बोलोन ये विषयींचा प्रकार सविस्तर त्यास उमजवूं; उपरांत तुह्मांस लिहून पाठवूं. तोपर्यंत त्यास हा मजकूर कळो न देणें. तुह्मी पत्रें सांडणीस्वाराबराबर पाठविलीं तीं पावलीं. श्रीमंतांसंनिध पावलियावर सर्व लिहून पाठवितों. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंति.