[ ५०० ]
श्री.
सेवेसी विज्ञापना. येथील कुशल तागायत छ ४ रमजान यथास्थित असे. विज्ञापना. येथील दिनचर्येचें वर्तमान तरः काल छ ३ रोजीं तिसरे प्रहरीं राजश्री पालखींत बसोन जननीच्या दर्शनास ह्मणोन दरवाजाखालीं आले. देवीचें दर्शन घेऊन माघारे गेले. आज प्रातःकाली हवालदार राजश्रीच्या दर्शनास वाडियांत गेले. तेव्हां मातुश्रीकडील शंभर माणूस वाडियांत देवढीस होतें. त्यांणी हवालदारांचीं माणसें आंत जाऊं न दिली. दों पोरग्यानिसी आंत गेले. राजश्रीस मुजरा जाहला. मातुश्रीस मुजरा जाहला. उपरांतिक अहिल्याबाईनें बोलाविले. त्याकडे गेले. तेथून माघारे चौकांत वृंदावनाजवळ आले, तों माघून दो बाव्हल्यांवर दोन वार टाकिले. त्याउपरि डोईवर च्यार पाच बसले. हवालदार ठार जाहाले. मुडदा उचलून हवालदाराच्या घरीं आणिला. त्याचे जावाई व सोइरे घरीं होते ते मुडद्यास माती द्यावयाची तरतुद करूं लागले. तों मातुश्रींनीं सांगून पाठविलें कीं, मुडद्यास माती तुह्मी न देणें, तुह्मी सारे. खाली जाणें. ह्मणून सांगून पाठविलें; आणि घरास दोनशे माणसांची चौकी पाठविली. हवालदारांचे जावाई व सोइरे मोकळे खालीं सोडले. तेच येथें येऊन वर्तमान सांगितले. तें सेवेसी लिहिलें असे. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना.