[ ४९७ ]
श्री.
पौ। छ १० रजब.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोदर महादेव स्वामी
गोसावी यांसीः --
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. तुह्मी अजुरदार कासिदाबराबर पत्र पाठविलेंत तें पावलें. दिल्लीतील व पठाणाकडील वगैरे बारिक मोठें वर्तमान लिहिले तें कळलें. ऐसियास, याउपरिहि, तिकडील नवलविशेष वर्तमान लिहिणें. येथील कुल अर्थ व कर्तव्यपदार्थाचा भाव लिहिणें तो लिहिला आहे; तदनुरूप पैरवी करणें, ती मंत्र गुप्त राखोन करून, स्वामिकार्यास उपयोगी पडे तें कराल. वर्तमान लिहीत जाणें. * जाणिजे. छ १ जमादिलाखर. पठाणाकडील मुलूख आह्मांकडे किती आला ? त्याचा तनखा काय ? तूर्त वसुल काय ? यंदा नख्त ऐवज हुजूर हातास किती येईल ? तो अजमास लिहिणें. वजिरांनी आजपावेतों ऐवज किती दिल्हा ? बाकी त्यांजकडे किती राहिली ? ते कधीं येणार ? हाहि अर्थ सर्व लिहिणें. दिल्लींत लबाड्या फार आहेत. वजिरासी, गाजुद्दीखानासी, सोय पडे; जावेतखान इकडील आहेत, यांचे साहित्यांत आहेत, ते त्यांचे साहित्यास लागत, ऐसे गुप्त रीतीनें करून, वजनदार मनसबा होऊन येई; तें करणें. विस्तारें सरदारांस आह्मी लिहिणें तें लिहिलें आहे. तुह्मीं सविस्तर वर्तमान लिहीत जाणें. बहुत काय लिहिणें ? तुह्मांकडे तो परगणे फारच चांगले साता आठाचे आहेत. त्यांपैकीं जरूर तर्तूद करून, पाचसाहा ऐवज वैशाखअखेर जेष्टअखेर येऊन पावे, तें करणें. ह्मणजे परगणे तुह्मांकडे करार राहातील. नाहीतर येथें वोढ आहे, रसदा येथें नव्या कमाविसदारांजवळून घेऊन सनद त्यांकडे होईल. यास्तव सत्वर ऐवज पाठविणें, ह्मणजे तुमचे हातूनच ते चाकरी घेऊं. या पत्राचें उत्तर येई तों रसद घेत नाहीं; वोढ सोसूं; तपशील लावून लिहिलें तर मग घेऊं, हे मामलत आहे.
(लेखन सीमा)