[ ४७० ]
श्री.
राजश्रियाविराजित राजमान्य रजश्री त्र्यंबकपंतबाबा स्वामीचे सेवेसीः--
सेवक नरहर शामराज कृतानेक सां। नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम ता। रा।खर जाणोन स्वकीय स्वानंद लिहीत गेलें पाहिजे. विशेष. इकडून दोन पत्रें सेवेसी पाठविली; परंतु प्रविष्ट होऊन हस्ताक्षरपत्रीं तोषविलें नाहीं, तेणेंकरून चित्त उदास आहे; तर हरघडी सांभाळ करीत असावें. पारचे गाऊ १८ प्रा। कनोज येथील कानगोह याचे दफतरी शुदामद आहे. त्यासी, तेथले जमीदार येऊन भेटले; आणि आपलें ठाणें घेऊन लस्कर फुरीं गेले. गढी तेथील पडली होती, ते नीट केली. त्यास, तिकडील कछोदीयाचा फौजदार रोज उठून खटखट करितो. त्याजकरितां जबरदस्तीनें गढी राखनें लागलें. सिबंदी प्यादे तीनसे च्यारसे ठेवनें लागले. व रा। धोंडो दत्तात्रय यांचे स्वारही पनास घेऊन आलों. दररोज पंचवीस रु॥ खर्च देणें लागले. तेथल्या फौजदारानें पाचसातसे माणूस व सेदीडसे स्वार जमा केले. आपण त्यासी झुजावें, तर आपली आज्ञा नाहीं, आणि सलुकें तर अमल देत नाही. याजकरितां, आपल्यास विनंति लि॥ जाते कीं, तेथील फौजदार वजिरास सांगून तगीर करवा; अग्रर बनलेंतर, तेथील इजारा करावा. जमा थोडकी आहे; याजमध्ये केल्या कस्टाचें सार्थक होतें, खर्च जाला तोही उगवतो, आणि नक्षा रहातो. आपण या कार्यास हइगई करील तर रु॥ खर्च जाले ते बुडतात ; दुसरी बदनक्षी होती. याजकरितां रो॥ मथुरादासपंत सेवेसी पा। आहे. जबानी सर्व वृत्त निवेदन करितां श्रुत होईल. पूल वजीर प्रा। मारीं मौजे दाईपुरी बांधितात. त्यास, रबीचे गाऊ कुल खराब होऊन पैसा हातास येणार नाहीं; आणि रयत दहशत लस्करामुळें खाऊन सडे राहिले आहेत. त्यासी, आपण रयतीचा दिलासा करून थांबाथांब केली आहे; परंतु विस्वास येत नाही. तर येथून पुल दूर होऊन आणिखा जागा बांधीत तर उत्तम आहे. येणेंकरून रबीचा पैसा वसूल होऊन येईल. ये गोष्टीचा सर्वस्व अभिमान धरून निर्वाह केला पाहिजें. आपल्या भरंवसियावर पारचें काम केलें आहे. लौकिकांत आपला नक्षा राहे तो पदार्थ करावा. बहुत. काय लिहिणें ? कृपा असो दीजे. हे. विनंति.