[ ४६५ ]
श्री.
श्रीमंत राजश्री
सुभेदार साहेब गोसावी यासी:----
स्ने॥ पुरुषोत्तम माहादेव आशिर्वाद विनंति विज्ञप्ति येथील कुशल ता। छ १ माहे शाबान मुक्काम शामळी प्रांत अंतरवेद जाणोन यथास्थित असे. विशेष. येथील वर्तमान, पात्र च्यार कासद जोड्यांसमागमें विस्तारें पत्रें पाठविलीं आहेत, त्यावरून श्रुत जाहालें असेल. परंतु प्रत्योत्तर सादर न जालें, आणि जोडी न आली. हालीं शाहा अबदाली लाहोरीहुन कूच करून सिखाचे मागें धावला, तो दो दिवसांत शतद्रु नदीवर धावणी करून, सडे स्वारीनसी पोहचून सिखासीं युद्ध केलें. सीख पाच सात हजार ठार जाले. कांहीं राहिले, ते धरले व पळोन गेले. आतां सरहंदेपलीकडे विसा कोसांवर आहे. सरहंदेत शालेमार बाग राहावयासी तयार करविला आहे. कांहीं एक दिवस तेथें राहणार. राजे लक्ष्मी नारायण सरहंदेकर-पूर्वी सरकारचा चाकर होता तोजेनखान फौजदार-शाहाचे तरफेचा-त्याचा दिवाण आहे. त्यानें शहास पन्नास लाख रुपये पेशकस कबूल करून, आला जाठाचे गढीस घेऊन जावें हा मनसुबा केला आहे. या गोष्टीस एक महिना लागेल. तें काम जालियावर मग ठाकूर सुरजमल्ल याजकडे येणार, वदंता आहे. ठाकरानें भरतपूर वगेरा गड कुल सरंजाम करून युद्धाचे तयारींत बसले आहेत. आगरियाचे किल्ल्याची बंदोबस्ती उत्तम प्रकारें केली आहे. या प्रकारचें वर्तमान येथील आहे. पातशहा अल्ली गोहर व षुज्यातेदौले हे झांशीचे किल्ल्याशी कजिया करितात. तमाम मुलखांत, झाशीकालपीचे मैदानांत अंमल बसवितात. आतां झांशीचे नजीक आहेत. पुढें पाहावें, कोणीकडे जातील ? होईल वृत्त तें विनंती लिहूं. कृपा केली पाहिजे. हे विनंती.