[ ४४० ]
श्री शके १७१८ कार्तिक वा। १३.
पौ। छ. ४ जमादिलाखर सबा तिसैन मार्गशीर्ष शु॥ ६.
साहेबाचे सेवेसीः- आज्ञाधारक जावजी पाटील गवळी रामराम विज्ञापना येथील क्षेम ता। छ. २६ जमादिलोवल पावेतों सेवकाचें वर्तमान यथास्थित असें. विशेष. पूर्वी सेवेसी जोडी रवाना केली आहे ती सेवेसी पावेल. त्यावरून ध्यानास येईल. श्रीमंताच्या व सर्व सरदार मंडळी व मानकरी व राजश्री नानाच्या भेटी कार्तिक वद्य १२ स नवसें त्रितीय प्रहरीं जाहल्या. प्रथम भेटी वडिलाच्या जाहल्या. मग राजश्री मालोजी राजे घोरपडे, व मग मषरुलमुलुख, मग राजश्री रघोजी भोसले, नंतर राजश्री दौलतराव बाबा शिंदे, व होळकर, याप्रमाणें मोठ्या समारंभांनी जाहल्या. आह्मास नानांनी बोलाऊन घेऊन गेले. आपल्या समागमें भेटी केली. तोफा पांचशेपरयंत बार जाहले. नंतर स्वारी फिरली. तेसमई श्रीमंताचे खवासखान्यांत श्रीमंत पंत प्रधान बाजीराव साहेब, यांचे खवासखान्यांत राजश्री अप्पा बळवंत, श्रीमंत पंत प्रधान अप्पासाहेब यांचे खवासखान्यांत राजश्री आबाजी कृष्ण सेलुकर श्रीमंत राजश्री अमृतराव साहेब यांचे खवासखान्यांत राजश्री गोविंदराव मामा याअन्वयें समारंभानें मग डेर्यास स्वारी गेली. भेटीसमई वडिलांनीं व सरदार मंडळी यांणीं कांहीं भेटी ठेविल्या नाहीत. व श्रीमंतांनीं कांहीं सरदार मंडळींसही भेटी. भंडारे मुंडवे येथे आहेत. अस्तमान पर्यंत जाहाले. वडिलांचे लष्कर विठ्ठलवाडीकडील कुच करून होऊन पुलाकडे कोथरुडाकडे आले. भोसले यांचा मुकाम पुणें नजीक संगमाआलीकडे आहे. शिंदे व होळकर व मषरुलमुलुक यांचे मुकाम प्रथम ठिकाणींच आहेत. सर्व एकचित्त आहेत. कारभार व परवानगी वगैरे कामें सर्व वडिलाचे आज्ञेप्रमाणें चालत आहेत. अद्याप शहरांत यावयाचा निश्चय नाहीं. पुढे सर्व एके ठिकाणी मसलत होऊन काय ठरेल तें ठरेल. वाडिलांस विनंती फौजेविशीं केली, की जलद येत आहे. त्यास, वडिलांनी सांगितले की, तुर्त नड आली आहे. तेथेच असावे. आह्मी सांगूतेव्हां यावे. आणि तिकडे सरकारी महाली उपद्रव देऊ नये, तिकडे कोण्ही मवासी वगैरे उपद्रव महालीं देतील. त्यांचे पारिपत्य करावे. फौजेविशई तर वडिलांनी असे सांगितले. मंगाराम काशिद जोडी महाडाचे मुकामास पाठविली. ती तेथें ना गेली, तों स्वारी निघाली. जलद पुण्यास पावली. पत्रें काशीद जोडीनीं पावती केली. त्याची उत्तरें तयार जाहली होती. परंतु फिरली. पुन्हां सेलुकराम लिहावयास सांगितलीं आहेत. फौजेचा विचार करून लिहून देतों ह्मणोन महाराजांस पूर्वीचे पत्रीं याच अन्वयें फौजेविशई विनंती लिहिली. राजश्री बाबाकडून वडिलांनी दोन हजार सामाननिशीं यावें ह्मणून लेहविलें. मजपासीं आतां याप्रमाणें सांगितलें. विनंती ही करितों - साहेबाचे ठिकाणीं ममता पूर्ववतप्रमाणेंच आहे. श्रीमंत राजश्री बाबासाहेब सुस्वरूप आहेत. खारखान्याची खर्चाची पेरवी केली इतक्यानें ठिक जाहलें. हुंड्या पुण्यास आझुन अल्या नाहीत. राजश्री रखमाजीराव देशमुख घरी गेले आहेत. ते कोलास येथें आल्यावर मग येणार आहेत. राजश्री बाबा फडके याचे डेरे गारपिरावर आहेत. प्रथम प्रथम सर्व जथून राहिले आहेत. फौजा भारी मिळाले आहेत. पुढील निश्चय काय होईल तो पहावा. राजश्री आबा चिटणीस अद्याप आले नाहींत. राजश्री राजाराम विठ्ठल पुण्यास आले आहेत. परगणे ग्वाल्हेरची सोडचिठ्ठी पाटीलबावांनी दिली. ती नानाकडे गेली. नानाचे जे माहोल जप्त होते ते दरोबस्त सोडिले. वडिलाचा आमल चोंकडे गेला. सेवकांनी साधनें धोंकडील ठेविली आहेत. पाटीलबावांकडील साधन राजश्री रायाजी पाटील याचे विद्यमानें राहिलें असें. राजश्री सदाशिव मल्हार कारभारी आहेत. याजकडील साधन ठेविलें असें. रा. खुशालचंद सेट याजकडून आणून साधन ठेविलें आहे. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.