[ ४३९ ]
श्री.
शके १७१७.
यादीः बापूजी महादेव व पुरुषोत्तम महादेव व देवराव महादेव हिंगणे वकील यांजकडे दिल्ली व जैनगर व सुजातद्दौला व बुंदी व रोहिल व पठाण वगैरे संस्थानच्या वकालती, व सरंजाम पा। कोंच गांव, व इनामगांव चांदोरी व धागूर व इनामजमिनी, व माहादजी सिंदे यांजकडे रोजमरा, व राउताची बोली बमोजिब सनद व असाम्या, बुंधेलखंडची मजमू व पा। अवटे येथील दप्तरदारी, व रामसेज किल्याच्या असाम्या, सुभा व सबनविसी, वगैरे सरकारांतून करार करून दिल्हा त्याप्रमाणें चालतात. अलीकडे बाळाजी लक्षमण जोसी संगमेश्वरकर चांदोरीस राहतो. त्यानें सरकारांत गैरवाका समजावून खोटी तकरार केली की सन समानखमसैनांत वीस लक्ष रु॥ मा।रानिलेकडे नजर करार केले ह्मणोन वकालती वगैरे सदरहूप्रमाणें याजकडे सांगितल्या. त्यांस वीस लक्ष रु॥ नजरपैकीं बाकी राहिली असतां मा।रनिलेकडे सदरहू चालते त्याजवरून पंचाईत नेमून दिली. पंचाईतमतें जोसीमजकुरांनीं तकरीर वगैरे केली ते सर्व खोटी जाली. नदारदची याद दप्तरची मरण्याची सरकारचे मोर्तबानसी होती ते मा।रनिलेनीं दाखविली. त्याजवरून हिंगणेमजकूर यांजकडे बाकी वगैरे सरकारचा लढा राहिला नाहीं. जोसी मजकूर बोलिला, तकरीर केली, ती पंचाईतमतें सर्व खेटी जाली. त्याजवरून मारनिलेकडील सदरहू कलमें पेशजीचे कदार बमोजीब मोकळीक करून घ्यावेंसी जाली. त्यास वीस लक्षाची वगैरे तकरीर समंध याजकडील जप्ती केली आहे ते कुलपूर्ववतप्रमाणें चालवणें ह्मणोन सनदा व पत्रें देणार स्वामी समर्थ आहेत. व गांवचा व जमिनीचा वसूल घेतला असेल तो माघारे देणें ह्मणोन पत्रें देणार स्वामी समर्थ आहेत.