[ ४३५ ]
श्री शके १७०४ अधिक ज्येष्ठ वद्य ३०
पौ छ १२ माहे मोहरम ऊर्फ मार्गेश्वर शुद्ध १४
मातुश्री बाईसाहेब व मातुश्री काकीसाहेबास सां। नमस्कार. श्रीमंत सौसंपन्न वज्रचुडेमंडित मातुश्री काकूबाईसाहेबाचे सेवेसी सां। नमस्कार.
श्रीमंत राजश्री दादा साहेब स्वामीचे सेवेसीः-
आज्ञांकित सेवक भवानीशंकर माहादेव कृतानेक सां। नमस्कार विनंति येथील कुशल ता। छ २९ मा। जमादिलाखर मु॥ दिल्ली यथास्थित जाणोन स्वानंदलेखनीं संतोषविलें पाहिजे. विशेष. बहुत दिवस जाले. पत्रीं सेवकाचा सांभाळ न जाला. तेणेंकरून चिंता लागली आहे. ते श्री जाणें ! त्यास, हमेशा श्रीमंत तात्यासाहेबास पत्र येतच आहे. त्या सदैव सेवकाची विस्मृत्य न पडतां सांभाळ करावा. वरकड, इकडील वर्तमान श्रीमंत यजमान स्वामीचे पत्रावरून साकल्य ध्यानास येईल. देशी येण्याचा प्रकार प्रस्तुत चातुर्माश्य दिल्लींतच राहणें जालें. कारण श्रीमंत अन्यासाहेब केवल लहान. विजयादशमी जालियानंतर निघणें होईल. सेवेसी श्रृत होय. जे समयीं काल्पीहून दिल्लीस आलों ते समयीं हा निश्चय होता कीं जेष्ट मासीं घरास जाऊं. अन्नोदक या स्थलींचा तो कैसा सुटतो ? ऋणानुबंध प्रमाण. बहुत काय लिहिणें ? हे विज्ञापना.