[ ४३२ ]
श्री
शके १६९५.
बारनिशीकारकिर्दीतील:-
१ माधवराव बल्लाळ यांचे बुद्धिकौशल्याची तारीफ शाहाणपणाची त्याविषयीं इतिहास गोष्टी.
१ राजकारणास मुख्यत्वें बातमी प्राधान्य. त्याविषयीं रावसाहेब पेशवे बहुत हुशार. मोठेमोठे व लहान जागा व अधिकारपरत्वें पुण्यांत व देशविदेशी संस्थानिकांजवळ बातमी दिवसरात्रीस जो व्यापार व्यवहार जो करील तो रावसाहेबांस येऊन बातमीदारांनीं श्रुत करावें. विदेशीं वकिलास 'कळवावें. असें असतां, हैदराबादेस मोंगलाजवळ हजारों रु॥ जवळ खिजमतगार जिलबी व मुदबखे वगैरे लहानथोरांस वर्षासनें नेमणूक चालत होती त्यांत मुदबख्यास चवदा रु॥ दरमहा श्रीमंतांकडून चालत होता. तेव्हां एकेसमईं कारभारी यांणी श्रीमंतांस विनंति केली कीं, चोपदार, भालदार, खिदमतगार, कुणाबिणी वगैरे यांस नेमणुकी व आणखी लोकांस आहेत त्या कारणपरत्वें, परंतु, मुदबल्यास नेमणूक व्यर्थ आहे. मुदबख्याचें काम देण्यासारखें नाहीं. ही नेमणूक काढतों. त्यासमई रावसाहेबीं उत्तर केलें कीं, पहिल्यापासून चालत आलें, काम तर नाहीं खरें, परंतु, जो पैसा खाईल आणि चाकरी न करील तो इतबारी. ह्मणून त्याचे धण्यांनी बाळगला. आपण त्यास देणें दिल्हें तें उपयोगावांचून दिसलें. त्यास, तो सुमनुष्य आहे, तरी तो चीज करील ; न करील तरी, हजारों रुपये खर्च होतात, त्यांत त्याचें देणें होतें, ह्मणून त्याचें मना करूं नये. चांगला आहे, तरी एखादे समयीं उपयोग करील. असें बोलल्यावरून नेमणूक चालविली. पुढें एके दिवशीं नवाबसाहेब आणि त्याचे खानगी व कारभारी जेवीत बसले. त्यावेळेस नवाबाचे मुखांतून वाक्यें निघालीं की, राघोबादादा मर्द माणूस होता, त्याजकडे पेशवाई न देतां माधवरायास पेशवाई दिल्ही ; आतां राघोबाचें मन उदास असेल ; अशांत आपण चढाई केली तरी आपले फते होईल, हें जाणून कारभारी यांणीही संमत दिल्हें. तेव्हां सामान सरंजाम तयारी करवा, ह्मणून सांगितलें. त्यांत परकी माणूस बातमी पोंहोचवण्यासारखें याचे बातमीदारांत मुदबख्याशिवाय दुसरें कोण्ही नहुतें. मुदबख्यांनी ऐकून वकिलास जाला मजकूर कळविला. त्या वकिलांनी पुण्यास श्रीमंतांस लिहिलें. श्रीमंतांनी कारभारियास विचारिलें:-- मोंगल चढाई करून येणार, त्यापेक्षां आपणच तयारी करावी, डेरे द्यावेत. ऐसे बोलिले आणि गुलटेंकडीवरी डेरे दिल्हे. लोकांस ताकीद होऊन खाशासुधां डेरेदाखल सुमुहूर्ते जाहाले: हें वर्तमान मोगलास कळलें. तेव्हां त्यांणीं विचार केला की, या समयीं आपण स्वारी केली तरी ते अगोधर हुशार जाले; त्यापेक्षां या समयीं आपली फत्ते नाहीं ; याकरितां सलुख करावा. जाणून वकिलास लेहून पाठवून तहाचें बोलणें घातलें. त्यांत नवीन चवदा लक्ष रुपये दरसाल देत जावे असें ठरविलें, आणि तीन माहाल दीड लाख रुपयेचे श्रीमंतांस दिल्हे. ते घेतल्यावरी कारभारियास रावसाहेबांनी उत्तर दिल्हें की, मुदबख्यास व्यर्थ देहनगी ह्मणत होता; त्यांणीही चाकरी करून देणें दिल्हें; आपला दाम हकनाकचा होता. याकरितां बातमी चीज मोठी आहे; यास दोन रुपये खर्च जाले तरी चिंत्ता नाहीं; यांत सराफी करूं नये. त्यावरून कारभारी उगीच राहिले. ही गोष्ट शके १६८१ सन सितैन मया व अलफचे सालीं जाले.
१ रघुनाथराव सचीव यांची व माधवराव पेशवे यांची दोस्ती फार स्नेहाची होती. त्याजवळ हरवख्ताची बातमी असे. तेव्हां, एके दिवशीं रात्रीस रघुनाथराव सचीव स्त्रीपुरुष उभयतां निजले होते. त्या विलासांत माधराव पेशवे यांचे स्त्रीनीं, गौरीचें हळदकुंकू चैत्रमासीं जालें त्यांत, नथ घातली होती. ती फार चांगली वाटून पंतांसी बोलली कीं, तशी नथ मला करून द्या. पंतांनी कबूल केलें, तशी नथ करून देऊं. ती बातमी प्रातःकाळीं श्रीमंतांस समजली. श्रीमंतांनीं वांकेनिसास बोलावून सांगितले की, सचीवपंतांकडे जाऊन, आतां भोजनास यावें ह्मणून निमंत्रण करून, बोलावणें करून, लवकर समयास बोलवावें; व घरांत त्यांचे स्त्रीसही निमंत्रण करावें. त्याप्रमाणें बांकेनिसांनी आमंत्रण केलें. भोजनास पानें मांडली. पंत, श्रीमंत, सन्निध बसोन जेविले. विडे देतेसमयीं, घरांतील बायकांची जेवणें जालीं ; विडे दिल्हे; अशी बातमी आली. येतांच खासगीवाले यांस बोलावून सांगितले की, घरांतील नथ काल घातली ती व खण, व पैठणी लुगडें, पंताचे स्त्रीस देऊन घरास जातील तेव्हां निरोप देण्यास सांगा. आज्ञा. त्याप्रमाणें खासगीवाले यांणी केलें. गेल्याची बातमी श्रीमंतांस कळविली. श्रीमंतांनीं पंतांस विचारिलें, रात्रीं आपण नथ नवी करून देतों ह्मणून कबूल केलें; ती नथ करून दिल्ही कीं नाहीं ? पंत चकटले. पाहूं लागले. त्यासमयीं खूण सांगतांच पंतांनी श्रीमंतांस विचारिलें, ही बातमी कशी कळली ? तेव्हां श्रीमंतांनी उत्तर दिल्हें-बातमीदार सांगावा, ही रीत नाहीं. मग पंतांनी विचार करितां ध्यानांत आणिलें, विषय जाल्यावरी मशालजी यास हांक मारिली, त्याणी दिवा सारिला तेव्हां त्याणी सांगितलें. मनांत गांठ बांधिली. अशी बातमी श्रीमंत ठेवीत होते !
१ श्रीमंतांचा फार वाखा जाला. मरणोन्मुख. त्यासमयीं रावसाहेबी बातमीचे कागद वगैरे दस्तऐवजी कागद पाहून पुढें कारणीक, उपयोगी, नाश न होण्यासारिखे, ते ठेवून बाकीचे कागद घंगाळांत घालोन, खिजमतगारापासोन अक्षरें पुसवोन, लादा करून, टाकावा. याप्रमाणें करीत असतां, एके दिवशीं भोजनोत्तर दोन घटिका कारभार करून, निजावयास गेले ह्मणजे कचेरी बरखास व्हावी. त्यासमयीं हा कारभार नित्य करीत असावा. असें करितां एके दिवशीं सखारामबापू कारभारी, त्यांजला कांहीं कामाचें विचारावयाचें प्रयोजन लागलें. ह्मणून, श्रीमंतांकडे आले. तों कोण्ही परवानगीशिवाय येऊ नये, अशी बंदी होती. त्यांत हे कारभारी, यास माणसांनी मना कसें करावें ? ह्मणुन न बोलतां येऊं दिल्हें. पुढे खाशाजवळीं जाण्याचे दारावरी पडदा होता तो उचलावयास लागतांच, खिजमतगारांनी सांगितलें, मनाई आहे ; कानावरी घालूंद्या. बोलोन आंत खिजमतगारास कळविलें. श्रीमंतांनी पडदा उचकटतां सखारामबापूस पाहिलें. येऊ द्या बोलले. बापू गेले. बैसले. ते कागद भिजवितात पाहून, ते कागद कांहीं पाहू लागले. दस्तऐवजी कागद असूं द्यावे, बोलले. त्यावरून श्रीमंतांनी सांगितले, जे दौलतीचे उपयोगी ते ठेवितों ; वरकड, मनुष्याचा नाश होण्यासारखे आहेत ते बुडवितों. तेव्हां, सखारामबापू बोलले, असे फितुरिकयाचे दस्तऐवज उपयोगी ते राखावेत. तें ऐकून, सखारामबापूचे कागद विठ्ठल सुंदरास व विठ्ठल सुंदर याचे कागद सखाराम बापूस आले गेले, --- राघोबादादाप्रकर्णी,-- ते कागद सखारामबापूपुढें टाकिले. ते पाहतांच बापू सर्द जाहाले. हें पाहून रावसाहेबांनी उत्तर केलें कीं, बापू ! हें राज्य आहे; तेव्हां मी असे अपराध्यांचे अपराध पोटांत ठेवून काम घेतलें नाहीं, आणि असे गुन्हे कां केले ? ह्मणून विचारिलें नाहीं. मी मरणार ; हे कागद मागें राहून त्या लोकांची घरें बुडणार ; मनुष्य तुटलें मग राज्य कशाचें ? याकरितां मनुष्य ज्या दौलतींत, तें राज्य ; असें समजून, हे कागद सारे बुडवितों, बोलले. सखारामबापू उगेंच राहिले. याप्रों। केलें. अशी बातमी रावसाहेबांची ! आणि दिल माठाची पुरुष होता. पुढें मृत्यु पावल्यावरी, सखाराम, पुरंदरे याचे घरचे शागीर्द, परंतु शहाणपणामुळें दादासाहेबीं मागून घेतले, कारभारी केले. आपणास वाढविले ह्मणून दादासाहेबांची ममता असतां, रमाबाई गरुदर नानास सल्ला देऊन, पुरंदरे यास सांगून, पुरंदर नानाचे स्वाधीन करवून, गर्मी राज्य पुढें चालविलें, असे कामदार नेकदार वागले, ह्मणून राज्य चाललें.