[ ४२७ ]
श्री पौ छ ७ जमादिलोखर.
शके १६८८ कार्तिक शुद्ध ६.
विनंति उपरि. आपलें पत्रच सांप्रत येत नाहीं. वर्तमान कळत नाही. शरीरप्रकृत कशी आहे ? काय आहे ? ते सर्व ल्याहावी. दाजी लिंबाळकर याचे मार्फतीनें बोली लागली आहे. त्याचा सिद्धांतःयांणीं देऊं नये; त्यांणी मागूं नये; आणि जाधवराव यास दादांनी समजावावें ; मीर मोगल यास निजामआलीनें समजावावें. याप्रों। घडल्यास परस्परें तह हवा. नवें इतकें निघालें आहे कीं, मोगलानें जाधवराव याची ज्यागीर जाधवराव यासच बहाल करावी, त्याचे मोबदला सरकारांतून दुसरी ज्यागीर लावून द्यावी. ही गोष्ट बनेल न बनेल, पाहावें. मोगलहि दाणिया दुणियामुळें हैरान ! हेहि खर्चाविसीं पूर्ण जळलेले; व मेहनत होईना ! पुढें कसें होईल ? यास्तव तह करणार !! एक नाईक मात्र या गोष्टीस वोढीत होते. पाहावें तेंहि ऐकावेसेंच आहे. एका दो दिवशीं काय तें निर्गमांत येईल. सर्वांचें मत निकाल पडावा हेंच आहे. दादांचा व सखारामपंताचा तो विचार निकाल पाडावा हेंच असें. पुढें होईल तें लेहून. सखारामपंत कारभार टाकून पोटाची बेगमी असे ते चालवावी, हें आठाचहू दिसांत करणार असे. जिजाबाईकडील राजकारण ठीक जाहालें. हेकी करितात. भरवसा पुरत नाहीं. पुरेल तेव्हां खरें ! परंतु आह्मी तंतु टाकिला असे. आपला प्रकार कसा ? हें कसें करावें ? ते तें कळावें. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. रा॥ छ ५ जमादिलाखर मंदवार दोन प्रहर.