[ ४२५ ]
श्री शके १६८८ वैशाख.
पु॥ श्रीमंत राजश्री केदारजी सिंदे सुभेदार गोसावी यासीः--
विनंति ऐसीजे तीर्थस्वरूप राजश्री बापूजी महादेव व आह्मी इंद्रप्रस्थी होतों, याजवरून श्रीमंतांनी आज्ञापत्र पाठविलें कीं, शाहा अबदालीकडे जाणें. याजकरितां लाहोरास शाहापाशीं उभयतां गेलों. जाबसाल समक्ष होणेयाचा तो जाला. विस्तार साहेबापाशीं पोहोंचून सविस्तर हकीकत करूं. सरकारच्या बोलण्यांत थोर वजन येऊन शाहावलीखान वजीर आपल्या मायेंत घेतला. यास्तव शाहानशाहांनीं मेहेरबानगी करून श्रीमंत राजश्री पंत प्रधानांस राज्याचा टिका, व केशरी पंजा, वस्त्रें, जवाहीर, घोडे, हस्ती, गुजरान केलें. मातबर माणूस आह्मांसमागमें देऊन रवाना तेलें. तो सरंजाम घेऊन येथपर्यंत सुखरूप पोहोंचलों. येथें पाहातों तों, आपली पत्रें, शाहास व दिल्लीचे उमरावांस हरएकाच्या मारफात येतात. त्यास, आह्मी आपली पूर्वापार सेवा करीत आलों. श्रीमंत कैलासवासी आपासाहेब व श्रीमंत राजश्री बाबासाहेब यांणी ( सुभेदारसाहेबीं व तदोत्तर श्रीमंत कैलासवासी नानासाहेबीं व हाली श्रीमंती ) इकडील वकालतचें काम आमचें हातें घेतलें. सरकारचे चाकर असों. आणि आह्मीही त्यासच खाविंद जाणतों. इतकें श्रीमंत राजश्री बाबासाहेबांचे शोखासाठीं येथें राहाणें जालें. इतके श्रम सोसले ते श्री जाणे ! असेंही असतां आपण आमचे हातें सेवा घेणार नाहीं, तेव्हां आमचे इतके श्रमाचा परिहार कोण करणार ? परस्परें पत्रें काय मजकूरचीं येत्यात ? तें न कळे. यास्तव साहेबास विनंति लिहिली आहे. दया करणार आपण समर्थ आहेत. दुसरें वेगळे वेगळे जाबसालांत सरकारचे कामांत अंतर होईल. आपले पूर्वापर चाकरास अविस्मरण आहे. सविस्तर भेटीनंतर. आह्मी तों आपले आहोंच.