[ ४२४ ]
श्री शके १६८८ चैत्र वद्य ११.
चिरंजीव राजश्री बज्याबास प्रति त्रिंबक सदाशिव आर्शीर्वाद उपर येथील कुशल ता। चैत्र वद्य एकादशी कुशल असो. विशेष. तुमची पत्रे कासी वाघ याजबा। आली ती प्रविष्ट होऊन सविस्तर अक्षरशः अवगत होऊन संतोष जाहला. सर्व दरबारचें भावरीत करणें हें समजोन त्याप्रमाणें आपलें स्वरूप रक्षून वर्ततां येविशीचें विविक्तपणें लिहिलें तें पाहून बहुत संतोष जाहला. याउपरी आमचे चित्ताची निशां जाहली. जे प्रकार आमचे मनांत होते ते तुह्मी समजला. व सर्व दृष्टीस पडलें. याचे बारीक मोठे पर्याय वारंवार आतां लिहिणें तुह्मास नलगे. हत्ती आला. चांगला सरस आहे. दुसरें पत्र तुमचें चैत्र शुद्ध त्रितीयेचें राजश्री तात्याकडे आलें होतें. त्यांनी पाठविलें तें पावले. हैदर नाईकाचा तह लौकरच होऊन माघारे फिरतील. व श्रीवेंकोबा बारा गांवें आहे, श्रीमंत जाणार आहेत, ह्मणून लिहिलें ते कळलें. श्रीचें दर्शन जाहालिया बहुत उत्तम आहे. लौकरच माघारे फिरला ह्मणजे बहुत संतोष आहे. वरच्यावर होईल वर्तमान लिहित जाणें. पोतनिशीचे वाटणीची निकड दादा वेंकाजी माणकेश्वर यांनी श्रीमंतास सांगोन शामरावास केली आहे. खंडोपंत पानशी, बाबावैद्य मध्यस्तींत आहेत, ह्मणोन तीन चार पत्रें शामरावाची आली. तुह्मी तो कांहीं लिहिलें नाही. त्यास तेथें मजकूर कस कसा होत आहे. तुह्मास कांहीं पुसतात किंवा रावसाहेब खावंदपणें मर्जीस येईल तें करवितात, याचें कसें तें लिहिणें. तुह्मास पुसिलें तरी पुण्यांत याद लिहविली त्याप्रमाणें विनंती करणें. नच पुसत तर कांहीं न बोलणें. खातरेस येईल ते करोत. चाकरीची वतनें गेली मग याची क्षिति किमर्थ होणार. का, जें होणें ते होऊं ! येविषीं शामरावाचे माणसाहातें दोन पत्रें तुह्मास पाठविली आहेत. पावतील. राजश्री तात्या श्रीमंत दादासाहेबाचे दर्शनास नर्मदेवर श्रीमंत आलियावर जाणार आहेत. हे आशिर्वाद.