[ ४२१ ]
श्रीवरद शक १६८६ कार्तिक.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री आबा स्वामीचे सेवेसी :-
पोष्य पुरुषोत्तम माहादेव साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ माहे जमादिलावल मुकाम दिल्ली जाणोन स्वानंदकुशल लिहित असावें. विशेष. राजश्री गणपतराव गोपाळ श्रीमंतांपासी यावयास सिद्ध आहेत. हे वडिलापासोन कदीम सरकारचे चाकर. मशारनिलेनीं श्रीमंतांस सविस्तर विनंति लिहिली आहे. ते आपण एकांतीं यजमानास ध्यानारूढ करून, उत्तर समर्पक घेऊन पाठवावे; ह्मणिजे हे तेथें येतील. तुर्त नजबखानापासीं. नगदीची सोय भक्षावयासी मात्र आहे. वरकड फौजेची सोय राऊमजकुराची अझूण जाली नाही. यास्तव श्रीमंतांपासी. येणार अभय जाल्यास, व आपण अभिमान धरून याची खातरजमा करून लिहाल तर, साहेबांपासीं येतील. आमचे खर्चाचे तंगीमुळें तेथें येणें न होय. तेथें सविस्तर पूर्वी श्रीमंतास लिहिलें आहे, त्याप्रमाणें बाळाजी गोविंद, गंगाधर गोविंद व झांशीकर रघुनाथ हरी, यांसी ताकीद करून, दरसालचे पांच हजार रुपये - दुसाला दाहा हजार - त्यांजकडे बाकी आहे ते घेऊन पाठविले पाहिजेत. व बाळाजी गोविंद यासी ताकीद करून, सरकारांतून तूर्त नेमणुकीपैकीं दहा हजार देविले आहेत, ते अझूण पाठवित नाहीत. तर, त्यांस ताकीद करून रुपये घेऊन पाठवाल, तर देणें लोकांचें थोडें बहुतवारून श्रीमतांपासीं येऊं, व येथील सविस्तर श्रुत करूं. पुढे आज्ञा करतील तैशी वर्तणुक करूं. येथल्याचा प्रकार : आजपावेतों आह्मांकडून श्रीमंतास लिहविलें, व त्यांनींहि लिहिलें, तें अझूण अमलांत येत नाहीं. इंग्रजांस अत्यंत भितातसें दिसतें. पूर्व पत्रीं यांचे लक्षणाचा विस्तार श्रीमंतास लिहिला तो तेथें प्रगट न करावा. येथें येथील वृत्त सविस्तर डाकेंत अजिगिरा बगैरे लावून वरचेवर येत आहे. यास्तव आमचे पत्राचा उल्लेख तेथें न करावा. पूर्वी यांचे जबानी वर्तमान लिहिलें, त्यांत संदेह असला तर, तो मजकूर यांचे जबानीचा आह्मी लिहिला असे. नजबखानास सविस्तर लिहून परस्पर उत्तर आणवून घ्यावें. लटिके वाद आह्मांकडे श्रीमंताचे मनांत घालवील तर न मानावे. श्रीमंतांचे मर्जी प्रसन्न होय तो प्रकार करून, यांची फौज देतील ते घेऊन येतों. नाहीं देतसे पाहून उठोन दर्शनास यावयास्तव खर्चास घेऊं. हे विनंति.