[ ४१९ ]
श्री
शके १६८५.
विनंति उपरि. आपण गेले. आह्मी येथें आलों, तों येथील प्रकार कांहींच ठीक न दिसला. याजबराबर मलकापूरा पावलों. मोगलहि तेथें पुढें बाळापुराकडे आला. हे तेथून फिरले ते फरदापुरचा घाट चढून, शहरास येऊन, पैठणावरून माहुरास आलों. मोगल जाफराबादेहून शलाऊ सांगवीस आले. शहरास जाणार. आमचे मागें शेर होऊन येणार. आमचेंहि माणूस जिकजिक जाहालें. ते हाव भरी जाले आहेत येथें कशांत कांहीं नाहीं. आपण स्वस्थ असावें. कोण्हेविसी चिंता न करावी. थोडकेच दिवसांत आपलें चित्त संतोष राहील. कोठें आहां ? काय वर्तमान ? तें ल्याहावें. बहुत काय लिहिणें ? बाबूजी यांणीं फत्तेसिंगबावाकडील गावाविसी फारच उत्पात केला होता. आह्मीं बळे राहविलें. सर्व चढले. कोणांत कांहीं राहिलें नाहीं. आह्मी धाकटे श्रीमंत यांची मर्जी राखावी हाच विचार केला असे. एका दो दिवशीं ते गाठ घालणार. लोक फार हैरान आहेत. कोण्हासी कोण्ही धरीलसें नाहीं. पाणिपताहून झुंजून पळाला ! येथें आबाईनेंच पळतो !! आपले लष्करांत आपणच लढतात ! बंद नाहीं ! हिंमत नाहीं ! विचार नाहीं ! ईश्वरीच्छा !!! होणें तसें होईल ! सर्व कळावें. आपलेकडे चित्त लागले आहे. भेट होईल तेव्हां सर्व कळेल. आपास यावयाची तातड होऊं न द्यावी. पत्र फाडावें. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.