[ ४१६ ]
श्री शके १६८३ ज्येष्ठ वद्य ५.
स्मरण. राजश्री बाळाजी बाजीराउ प्रधान स्वारीस गेले होते ते खेचिवाड्यापासून माघारे फिरोन टोंक्यास आले. तेथें आठ चार दिवस मुक्काम होता. तेथून कूच करून जेष्ट सुध २ सके १६८३ गुरुवारी तिसरा प्रहरा अमदाबादेहून सत्रा अठरा कोस लांब मजल करून येर्हवडियावर येऊन धर्मशाळेपासीं येऊन मुकाम केला. दुसरे दिवशीं शुक्रवार घातवार ह्मणून तथेंच राहिले. मंदवारी प्रहरीं रात्री हत्तीवर बैसून गांवांत आले. त्यावर दोन चार दिवस बाहेर पालखीत बैसून जात असेत. सुध दसमी सुक्रवार पर्वतीस गेले होते. तेथें एक ढाळ जाला. त्यानें हैराण होऊन घरास
आले ते निजले. दोन चार दिवस ढाळच होत होते. त्यानें शरीर क्षीण पडत पडत फारच वेग आले. मग जेष्ट वद्य पंचमी सोमवारी जागा पालट करावयास पर्वतीस गेले. वद्य शष्टी मंगळवारी साता घटका रात्री देहअवसान जालें. शततारका नक्षत्र, विष्कंवयोग, छ १८ जिलकाद. दहन पुलाचे दक्षणेस केलें. सन ११७१. सुहुरसन इसन्ने सितैन मया अलफ. शके १६८३, वृषानाम संवत्सरे.