[ ४१५ ]
श्री शके १६८३ ज्येष्ठ शुद्ध १५.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री पुरुषोत्तमपंत नाना स्वामीचे शेवेसीः---
पो। बाळाजी जनार्दन साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ १३ जिल्कापावेतों मु॥ श्रीटोंकें, गंगा दक्षिणतीर, येथें असो. विशेष. तुह्मांपासून निघालों ते ग्वालेरीसच आलों. त्यावर तुमचीं आमचीं पत्रें जात येत असतच. त्यानंतर तेथून निघालों ते शिरोजेपावेतों आलो. तेथून राजश्री आयुध्याप्रसाद मिसरजी यांची रवानगी तुह्माकडे केली, कांहीं संशय होता ह्मणून. परंतु तो संशय गणेश वेदांती यांची पत्रें आलियावरून दूरही जाहला. त्यानंतर मिसरजीस पत्र पाठविलें की, संशय गेला, तुह्मीं पन्नदर्शनी यावें. तों ते लांब गेले. मग जाब पाठविला. मागून येतों, ह्मणून लिहिलें. हें वर्तमान सविस्तर त्यांणी सांगितलें असेल, त्यावरून कळलेंच असेल. शिरोंजेहून दरमजल आलों ते बर्हाणपूरचे मुक्कामीं श्रीमंताची भेट जाहली. मर्जीचा प्रकार ह्मणावा तर, अस्ती चर्म मात्र राहिलें आहे. शरीर फारच कृश झालें. घटकेच्या गोष्टीचें स्मरण राहत नाहीं. ज्याजवर रागें न भरावयाचें त्याजवर भरावें, मनास येईल तें करावें, ही प्रकृत पाहून फारच श्रम जाहले. उपाय काय ? ईश्वरें कसें तरी त्यांस सलामत राखावें, हेंच ईश्वराजवळ मागणे आहे. तमाम मुत्सदी निरोप मागून देवास वगैरे जागा जागा गेले. ठिकाव होता कठीण. वगैरे कितेक बारीक बारीक मर्जी फारच बिघडली आहे. ती लिहितां येत नाही. औरंगाबादेजवळ आल्यावर राजश्री देवराव यांचे बंधू तेथें होते ते आले. त्यांची भेट जाहाली. मग मिसरजीकडील वगैरे सर्व वर्तमान त्याजपाशींच मात्र सांगितले. त्यांचे आमचे विचारें ठराव जाहला कीं, श्रीमंताजवळ बोलावयाचें नाहीं. श्रीमंत राजश्री दादासाहेबासच विनंती करून मग काय ठराव होईल तो करावा. असा निश्चय करून ती गोष्ट तशीच ठेविली. याची कारणें फार आहेत. कोणाजवळ काय बोलतील हा भरंवसा नाहीं. भलत्याच जवळ बोललें तर तेथें वर्तमान प्रकटून विकोपास गोष्ट जाईल हे एक; व एके घटकेस एक बोलणें अशानें परिणाम कसा लागतो ? अशा बहुत गोष्टी चित्तांत आणून ठेविलें. श्रीमंत, चार दिवस झाले, पुण्यास गेले. आह्मी मातोश्रीचें कार्य करावयास्तव टोंके येथें राहिलों. राजश्री देवरावतात्याही आह्माजवळच आहेत. श्रीमंताबरोबर फिरोन खर्चखालीं मात्र यावें ते गंगातीरींच कां न राहिले ? यास्तव राहिले. त्यांनी तुह्मास पत्र लिहिलें आहे त्यावरून कळेल. श्रीमंतांचा यख्तियार प्रस्तुत हिंदुस्तानचा मल्हारबावरच आहे. याप्रों। वर्तमान आहे. तुह्मास कळावें यास्तव लिहिले आहे. आमचे महादेवाचे ध्यानाची तसबीर लाला बाळ गोविंद याजपाशी आहे. ती जरूर आणून राजश्री त्रिंबकराव शिवदेव याजपाशीं देवावी. ह्मणजे आह्मास पावेल. ही गोष्ट जरूर जाणोन करावी. व आपल्यासही फार दिवस तिकडे जाऊन झाले, एकदां घरीं यावें. आणि मातोश्रीस भेटून मग काय कर्तव्य तें करावें. तुह्मीं पत्रे छ ३० रमजानची पाठविली ती पावलीं. मातोश्रीचे शोधास माणसें पाठविली ह्मणून लिहिलें. तो शोध कळल्यावर लिहून पाठवावा. व याबूक अल्लीखानाचा मजकूर व अल्लीगोहर यास श्रीमंताचे पत्र पाठवावयाचा प्रकार व सदासिव पाळंदे याजकडील पत्र, वगैरे सर्व कळलें. श्रीमंतांची पत्रें व कृष्णराव पारसनिसाचे पत्र, ऐशीं पुण्यास रवाना केली आहेत. प्रतिउत्तर आलियावर पाठवूं , तेव्हां सविस्तर मजकूर लिहून पाठवू. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ असो दीजे. हे विनंति. मातोश्रीचे कार्य संपादावयाचें होतें, परंतु तुमचे पत्र थोडेसें संशयात्मक आलें कीं, खरखोंदी याकडे आहेत अशी खबर येत्ये, तिकडे माणसें पाठविली आहेत. तीं आलियावर जें कर्तव्य तें करूं, सर्व वर्तमान मिसरजीस सांगावें. हे विनंति. बाळ गोविंद यास व राजश्री त्रिंबकराव शिवदेव व मिसरजी यास पत्रें पाठविली आहेत. ही ज्याची त्यास पावती करावी आणि महादेवाचें चित्र आधीं पाठवावें. अनमान सहसा न करावा... हे विनंति. *