[ ४०० ]
श्री शके १६८१ माघ वद्य १०
तीर्थस्वरूप राजेश्री बापूसाहेब वडिलाचे सेवेसीः-
बालकें दिवाकराने कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल तागाईत छ २३ जमादिलासर मुकाम श्री सिध्धटेंक भीमातीर लष्कर श्रीमंतराजश्री पंत प्रधान वडिलांचे आशीर्वादें यथास्थित असे. यानंतर, बहुत दिवस जाले, वडिलांकडील हस्ताक्षर आशीर्वादपत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तर ऐसें न करावें. सदोदित हस्ताक्षर पत्र पाठविलें पाहिजे की समाधान होये. यानंतर इकडील वर्तमान साकल्य तीर्थस्वरूप राजश्री नानासाहेबांस लिहिलें आहे त्याजवरून कळेल. श्रीमंतस्वामीचा व निजामअल्लीखानाचा सलुख जाला. श्रीकृपेनें श्रीमंतस्वामीचा ज्यय जाला. मोगल ज्या तमानें व सरंजामाने आला होता तो सर्व एकीकडे राहून फजीत बहुत जाला. याचा तपसील तीर्थस्वरूप नानाच्या पत्रावरून कळेल. वर्तमान यथास्थित असे. आह्मी राजश्री नारो शंकर याजसमागमें आठा दहा रोजांनी श्रीमंत स्वामीचा निरोप घेऊन हिंदुस्थान प्रांतीं येतों. वडिलाचे चरणदर्शनाचें ध्यान अहर्निशीं लागलें आहे. सत्वरच येऊन चरणदर्शनलाभ घेतो. आपल्या भेटीस्तव मातुश्री आक्का बहुत श्रमी होत्यात. तें पत्रीं कोठवर लिहावें ? मातुश्रीची आपली भेट सत्वर होये तो अर्थ केला पाहिजे. संक्रमणाचे तील शर्करायुक्त सेवेसी पाठविले आहेत. कृपा करून स्वीकारून उत्तर पाठविण्या वडिल समर्थ आहेत. विशेष काय लिहिणें ? चरणदर्शनलाभ होये तो सुदिन. कृपा केली पाहिजे. हे विज्ञापना.
वेदमूर्ति राजमान्य राजश्री धोंड दीक्षित पटवर्धन स्वामीस साष्टांग नमस्कार विनंति उपर. सदोदित आशीर्वाद पत्र पाठऊन अविस्मर असावें. आक्रमणाचे तील शर्करायुक्त सो। पाठविले, कृपा करून स्वीकारावे व तर पाठविलें पाहिजे. बहुत काय लिहिणें ! भेट होईल तो सुदिन. पा लोभ असो दीजे. हे विनंति.
सर्व मंडळीस सां। नमस्कार. तील शर्करा घेऊन उत्तर पाठवणें. हे विनंति.
सो। विनंति सेवक गिरमाजी मुकुंद कृतानेक सां। नमस्कार विनंति ....हिली परिसीजे. कृपा केली पाहिजे. हे विनंति.