[ ३९२ ]
श्री शके १६८० आश्विन शुद्ध १.
राजश्रियाविराजत राजमान्य राजश्री पुरुषोत्तम माहादेव गोसावी यांसीः--
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मी विनंतीपत्र छ १५ मोहरमचें पाठविलें तें छ २५ मिनहूस पावलें. गाजुद्दीखान यांचे सांगितल्यावरून च्यार पाच प्रकारचे मनसबे लिहिले ते कळले. रोहिले पठाणाचा मजकूर अवगत जाहला. ऐसियास, गाजुद्दीखान हुजूर येऊन पठाणाचा दार मदार केला ह्मणून तुह्मांस पाठविलें. नाहीं तरी त्यास पदरीं घ्यावयाचें फारसें अगत्य नव्हतें. असो. तुह्मी हुजूर यावयाची उतावळी न करणें. मनसब्याचे दिवसही पुढेंच आहेत. त्यास, रोहिले पठाणांनी आमचे मर्जीप्रमाणें वर्तणूक करून कृपा संपादून घेतली तर उत्तमच जाहलें. नाहींतरी पुढें तुह्मांस बोलाऊन घेतलें जाईल. जाणिजे. छ २९ मोहरम.
लेखना
वधि.
पौ छ ८ सफर
बुधवार तिसरा प्रहर.