[ ३८६ ]
श्री शके १६८० आषाढ वद्य १४.
चिरंजीव साहेबास अनेक आशीर्वाद उपर येथील क्षेम ता। छ २७ जिल्काद मु॥ नदी वासन नजिक उदेपूर तीस कोस जाणून स्वक्षेम लिहिणें. विशेष. इकडील वृत्त सविस्तर अलाहिदे पुर्वणीवरून कळेल. विशेष. रा। अंताजीपंतास सा महिनिया लाख रुपये द्यावेसे करार केला. व बाळाजी शामराजाकडून लाख रुपये घेऊन द्यावे. त्यांनी आजवर देतों देतों केलें. शेवटीं अंताजीपंताचा तगादा सख्त लागला; माणसें बसलीं; कष्टाचा पार लिहावासा नाहीं ! मुख्य बाळाजी पंताकडून पन्नास हजार रुपये येतील यांत संदेह नाहीं. जोवर तो रुपया ये, तोंवर यांचा तगादा कोठवर सोसावा ? यास्तव रा।. धोंडाजी नाइकाचे विचारें हे गोष्ट ठैराविली की, बाळाजीपंताकडील ऐवज तुह्मांकडे पोहचावून द्यावा. श्रीमंताचे तनखेदारास जेंवर हा रुपया पोहचे तोंवर कर्जवाम करून, रा। रघुनाथनायकाचे विचारें लाख रुपये द्यावे. विना दिधल्या जीव न सुटे; हें जाणून श्रीमंताचे तरफेनें रा। गंगाधर बाजीरायाचे पथकासी एक महिनियाचे वायदियानें लाख रुपयाची तनखा घेतली, व अंताजीपासून सुटलों. त्यांचे रुपये दिधले पाहिजेत. वायदियास आठरोज अधिक लागले तर, गम खाऊं, हा करार करून घेऊन तुह्मांवर चिठ्ठी दिधली. हे संकट पार पाडलें पाहिजे; यास्तव, राजश्री रघुनाथनाइकास रा॥ धोंडाजीनाइकाचें पत्रें -परमारें व तुमचेहि पत्रांत-- पाठविलें आहे. जसे बनेल तसें कर्जवाम करून हें झट वारावें. व बाळाजीपंताचा ऐवज पाठवूं तो कर्जदारास देणें. याप्रों। ठैराविलें आहे. पत्र तुह्मांस अगाऊं पाठविलें असे कीं, रुपये देणें आले; दिधल्याविना गत्य नाही. येथें ऐवज नाहीं. बाळाजीपंताकडून यावयास दोन दिवस अधिक लागतील, यास्तव हें कर्म केलें. तें पार पडून पत व जीव राहे तें करणें. विशेष खोलून लिहावें तर, तुह्मी सर्व जाणत आहां; लिहावेंसे नाही. जर या गोष्टीस आगेंमागें देईन ह्मणतो तर प्राण तो गेलाच, मुखावर फासण्या होत्या. यास्तव हिमत धरून हें काम करणें. आशाढ वा। १३ पासून श्रावण वा। १३स लाख रुपये देणें करार ठैरला असे. त्याप्रों। देऊन रसीद घेऊन पाठवणें कीं, अंताजीपंतापासून खत घेऊं तें करणें. हरतजविजीनें रुपये देणें. यादोपंतास व लक्ष्मण गिरधरास फारच समाधानानें ठिवणें. कांकी, पुरातन चाकर कामाचे आहेत. त्यास सरफराज केलेंच असेल. मायेंत ठिवणें. मुख्य हरतजविजीनें हे रुपये देणें. फिरोन लिहावयासी अवकाश राहिला नाहीं. यास्तव अजुरदार जोडी पाठविली असे. तर लाइलाजी खेद करून सार्थक नाहीं. पुढें श्रीमंत कृपा करून यथास्थित करितील तर, बाकीचे रुपये वसूल करून देऊं. नाहीं तर जें होणार तें होईल. श्री कृपा करणार समर्थ आहे ! चिंता नकरणें. अतःपर आह्मी रा। जनकोजी शिंदे याजबराबर जातों. श्रीकृपेनें तेहि मायेंत आहेत. तुह्मी आह्मी सर्वांनी देशासच गेल्यानें सार्थक काय ? यास्तव एकजण राहिलों. श्रीकृपा करणार समर्थ आहे. चिंता न करणें. गिरधर लक्ष्मण तीर्थरूपाचे वेळेचीं मनुष्यें आहेत. त्याजवर कृपा करीत जाणें. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद. मूळ याची तनखा आहे. त्याची रा। रघुनाथ नाईक यांचे विचारें श्रावण वा। १३स रुपये पावेत तें करणें. हे आशीर्वाद. मातुश्री आईस सा। नमस्कार. चिरंजीव बचाबाईस आशीर्वाद. पै॥ छ २६ माहे जिल्हेज.