[ ३८४ ]
श्री शके १६८० वैशाख.
पु॥ श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामीचे सेवेसी.
विज्ञप्ती ऐसीजेः-- लाहोरीहून तीर्थस्वरूप राजश्री बापूजी महादेव यांची विनंतिपत्रें स्वामींस आली, ती सेवेसीं पाठविली आहेत, त्यांजवरून श्रुत होय. ते स्थलीचें वर्तमान याप्रमाणेः--
राजे रणजितदेव, जंबूचे, यांणीं शाहाची मुलाजमत केली. याजवर शाहाची बहुत मेहरबानगी, ह्मणोन पूर्वी सेवेसी विनंति लिहिली होती. हालीं राजेमजकुरास शाहांनी रुसकत करून कश्मीरच्या प्रांतास पाठविलें. आणि याजसमागमें शाहांनीही आपली तीन च्यार हजार फौज देऊन पाठविलें. तो कश्मीरचे जमीदारांनी घाटरस्ता फौजेचा येयाजायाचा मार्ग बंद केला. कश्मीरचा सुभा सुखजीवनराम याचे पारपत्यास्तव रणजितदेव गेले आहेत. आणि शाहांनीही पाठविलें आहे. परंतु, त्याणें अगोधरच घाटाचें नाकें बंद केलें; यास्तव राजेमजकूरही माघारा जंबूस जाणार; व शाहाची फौज माघारा याजपासी येणार; ह्मणोन नवें वर्तमान येथें ऐकिलें. पुढे होईल ते विनंति लिहूं.
सिखांनी सरहंदच्या प्रांतांत गलबा केला, ह्मणोन पूर्वी सेवेसी विनंतिं लिहिली होती. आलिकडे, जेनखान फौजहार, महालमजकूरचा, यांणीं पन्नास हजार रुकडही देऊं करून सलूख केला. सिखांनी कूच करून दहाबारा कोस गेले, तों जेनखानांनीं दगा करून सिखाची बाहिर लुटली. यास्तव सिखांनी माघारा फिरून जेनखानाची बाहिर लुटून, लछमी नारायेण याचा दिवाण याजला लुटून, लढाईस मागती सिध्ध जाले. हरनुलगढ सरहंदेपासून पंधरा कोस तेथें उभयतांची लढाई लागली आहे ह्मणोन वर्तमान आले. मागाहून वर्तमान आलिया सविस्तर लिहून पाठवू.
सेवेसी श्रुत होय.