[ ३६५ ]
श्री शके १६७८ पौष वद्य ३०.
राजश्री मल्हारजी होळकर सुभेदार गोसावी यासीः--
छ श्रीसकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। बापूजी माहादेव, व दामोदर माहादेव, व पुरुषोत्तम माहादेव, व देवराऊ महादेव अनेक आशीर्वाद विनंति उपरि येथील कुशल ता। छ माहे रा।खर मुक्काम इंद्रप्रस्थ जाणून स्वकीय निजानदंवैभव लेखन करीत असिलें पा।. विशेष. येथील वर्तमान पूर्वी वरचेवर गोसावियांसी लिहीत गेलों; परंतु एकाही पत्राचें उत्तर न आलें. सांप्रतचें वृत्त तर, छ २७ माहे रा।वलीं अबदाली मातबर फौजेसहित लाहोरास दाखल होऊन, जलूस बहुतसा करून, जागजागां आपले नायब रवाना केले, व करीत जातो : व जमीदारही जाऊन भेटतात. अदिनाबेग, सदिलाबेग, व जमीबुद्दीखां हे, त्रिवर्ग त्याची अमद अमद ऐकान आधीच सरकोन लाखीजंगकडे गेले. सन्मुख देखील न आले. व सिरहंदेस बहादुरखां बलेचांचा नायब, राजश्री लक्ष्मीनरायण होता तोही माघारें फिरला. जंबूच्या राज्यानें झुंजाची तयारी केली आहे, हे पठाणांनी ऐकोन त्याजकडे फौज दाहा हजार रा। केली. झुंज होतें. बहुधा राज्यानें कमबेश मामलत करून मुलूख रक्षिला असेल. जाबसाल लागून राहिला होता. प्रो। जलालाबाद, व अदिनानगर, व नूरमाहाल, व जालंधर, यांत हरस्थळीं अमल दाखल आबदालियाचा जाला, व करून घेतला. जागजागां सरदारांच्या नेमणुकी होत जातात. लाहोराअलीकडे बेहानदी व शतद्रू ह्मणून दोन नद्या आहेत. दोही नद्यांचा मध्यदेश, खोजे अबदुल्ला नामें सरदार यास दिधला. त्यास, दिवसेंदिवस त्याचे फौजेची पेशकदमी आहे. त्याहीवर येथें कोण्ही मर्द माणूस नाहीं, हेंही अबदाली यास. कळून चुकलें. पिसोर सोडून आजी तीन महिने जाले. दिल्लींत फौज नाहीं. सर्व मनुष्यमात्र आपलाले स्थळीं चिंताक्रांत ! तजविजा मात्र होतात, व करितात ! हे वार्ता पैदरपै त्याजकडे जाते. परंतु एक वसवास आपल्याकडील कीं, मातबर फौजेनसी रा॥ सुभेदार या प्रांतीं आलियाखेरीज राहणार नाहीत. व, आलियानंतर मनसबा व लढाई थोर आहे, व होईल. ये गोष्टीचा अवकाश फारसा जाणोन दिलेरीवर गोष्ट फर्मावून हळूहळू या प्रांती येत जातो. दिल्लीवालेही कितेक सरदार त्यासी भेदले आहेत. पाहावें काय निदर्शनास येतें तें !! राजश्री अंताजी माणकेश्वर याजकडे अमात्यांनी-आजी तीन महिने जाले, गुलाबराय मुनशी, व महघूबसिंगास पाठविलें होतें. त्यास, छ ८ माहे मजकुरी पंत मशारनिल्हे येथें येऊन फौजेसहित दाखल जाले. यमुनापार पटपटगंजासमीप उतरले आहेत. छ ११ तारखेस मुलाजमत त्यांची जाली. विना आपली स्वारी या प्रांती येत नाहीं, तो काळपर्यंत हिंदुस्थानचा बंदोबस्त व अबरू व सलतनत राहत नाही. पूर्वी अबदाली यानें कलंदरखां नामें यलची पाठविला होता त्याजला आमात्यांनी एकमास आपल्या समीप ठेऊन घेऊन सांप्रत तोफा चीजबस्त देऊन रुकसत केले. व तिकडले सरदारांसही साम, दाम, दंड, भेद, करावयीसी कांहीं वस्त्रे भूषणें पाठविलीं आहेत. अशा गोष्टीनें ते ममतेंत येतात तो पदार्थ नाहीं; परंतु हे आपल्याकडून सिष्टाचार करितात. शाहावल्ली, अबदाली याचा वजीर, त्याचा बंधू + + अल्लीखां, व शाहाफना नामें फकीर, त्यांचे ठायीं अबदाली याची परम निष्ठा जाणोन, अमात्यांनी उभयतांस आपल्या समीप बहुता दिवसांपासोन ठेवून घेतलें होतें. सांप्रत त्यांजलाही अबदालियाकडे रा॥ केलें, की, तुह्मी तेथें जाऊन शाहास उत्तम प्रकारें बोध करणें. हिंदुस्थानची सलतनत थोर आहे. फौजेची कांहीं कमी नाहीं. त्याजवर नवाब बहादुराचे समयीं करारमदार जाले आहेत की, हिंदुस्थानावर फिरोन न यावें. ऐसे असतां, बदमामली करून हिंदुस्थानची मोहीम करूं इच्छितां, हे तुह्मांस विहित नाहीं. अतःपर माघारें फिरोन जावें. तथापि थोडाबहुत खर्चवेंचही कबूल करावा. या गोष्टीवर ठहराव होता न देखाल, महमदशाहाची कन्या अबदाली याचे पुत्रास देवूं करा, ह्मणून बोलून ठाव गाठावयासी पाठविलें आहे. व फौजबंदीही करितात. व फाबेग व बाकर बेग यांची तकसीर माफ करून, चौ हजारा स्वारांचा रिसाला देऊन नोकर ठेविलें. व नजीबखानास दीड लक्ष रुपये दरमहा मुकरर करून आपला रफीक केला. त्यानेंही आपले बहिर बुनगे देशी रा॥ करून जरिदा होऊन राहिला आहे. राजश्री अंताजीपंतासमागमें पाचसा हजार स्वार प्यादा असे. व समशेरबहादर यांसही पाचारिलें आहे. दक्षणी फौज मातबर जालियानंतर बाहेर निघणार. पुढें जो मनसबा निदर्शनास येईल, तो मागाहून लिहिला जाईल. संक्रमणाचे तीळ शर्करायुक्त पाठविले आहेत, ते स्वीकारून उत्तरीं गौरविलें पाहिजे.