[ ३६२ ]
श्री शके १६७८ कार्तिक वद्य ९.
श्रीमंत राजश्री दामोदरपंत यांप्रतिः--
श्रीवाराणसीहून बाळकृष्ण दीक्षित अनेक आशीर्वाद उपरी येथील क्षेम जाणून स्वकीयें कुशल लिहावयासी आज्ञा केली पाहीजे. विशेष. आपणांकडील कांहीं वर्तमान कळत नाहीं, तर सविस्तर लिहीलें पाहीजे. विशेष. नवाब प्रतापगडास आले ह्मणऊन आयकिलें. त्यास कोणीकडे जाणार ? येथें तर सावकारांहीं सुभिता केला. सर्व गेले. लोक भयाभीत आहेत. त्यास, तुह्मीं असतां आपणास चिंता वाटत नाही. सर्व भरवसा आपला आहे. यात्राही जाणार आहे. कृष्णाजीपंतांहीं व आपा जोसी यांहीं पत्रें लीहीलीं आहेत, वरून कळेल. सुज्ञांप्रति बहुत काय लीहीणें ? लोभ असो देणें. पत्राचें उत्तर सत्वर पाठवून देणें. हे आशीर्वाद. मिति का० वदी ९ बुधवार.
राजश्री त्रींबकपंत याप्रतिः--
बाळकृष्ण दीक्षित अनेक आशिर्वाद. उपरि. हरीदास कृपारामाबाबद जोडी पाठविली आहे; त्याचा जाबसाल होत असला, तरि जोडी ठेवावी; नाहिंतरि, जोडी फिरोन पाठवावी. आणि या प्रांतास नवाब वजिराची अवाई आहे ऐसें आयकतों. तरि त्याचे ये प्रांतास येणार असला तरि, एक चोबदार आमचा देवडीवर धाडून द्यावा. ह्मणजे येथें ब्राह्मणांस उपद्रव होणार नाहीं. तरि हें अगत्य असें. बहूत काय लिहिणे ? लोभ असो दीजे. हे आशिर्वाद. यवनांचे सैन्य अणिवार, यास्तव श्रीमंतास विनंति करून त्वरें उत्तर पाठवावें. हे आशिर्वाद. *