[ ३४३ ]
श्रीशंकर शके १६७७ भाद्रपद वा। ९.
श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामीचे सेवेसीः--
विनंति सेवक गंगाधर शिवराम कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता। छ. २२ जिल्हेज मुक्काम लष्कर नजीक श्रीमथुरा जाणून स्वानंदलेखन. आज्ञा केली पाहिजे. विशेष. स्वामींनी कृपा करून जासुदाबरोबर पत्र पाठविलें तें पावून सनाथ जालों. पत्रीं मजकूर कीं, ति॥ सो।ची पत्रें देशीं येण्याविशीं बहुत जलदीचीं आलीं, व लष्करांत आल्यानें मिश्रजीचा तंटा पडेल, यास्तव सर्व सरदारांचें अभय पक्केपणीं घेऊन लिहावें, ह्मणजे त्याप्रमाणें केलें जाईल. ह्मणून पत्रीं विस्तारें आज्ञा. त्यास, राजश्री राजारामपंत भाऊस पत्र होतें तें मशारनिल्हेस पावतें केलें. त्यावरून सर्वांस आश्चर्य झालें. सरकारची आबादानी होती. असो. तेथील विचार झाला तो सारा सेवकानें वरचेवर आजूरदार करून तपशिलें विनंतिपत्रें पाठविलें कीं, लौकर स्वारी आल्यानें दसर्या दिपवाळीपावेतों येथें राहून, स्वसंतोषें सरदारांचा निरोप घेऊन, देशी जावें. याअर्थी वरचेवर सेवेसी लिहीत गेलों, तें स्वामीचे विच्यारास न आलें. मिश्रजीचा संशय जाणून तिकडे दिवस लांबणीखालीं गेले. स्वामीनी पत्रें सर्वांस लिहिली. त्यास, तें पत्रें दिधल्यानें सध्या लौकिक होता. यास्तव रा। भाऊचे विचारें ठरलें कीं, येक वेळां येथें होऊन निरोप घेऊन गेलियानें ठीक आहे; नाहींतर येथें कारकूनासदेखील राहावयाचें ठिकाण राहणार नाहीं. त्यास, निर्विकल्प स्वामींनीं यावें. मिश्रजींनी कार्य करणें येविशीं खातरजमा राखून सत्वर आलें पाहिजे. परभारें गेल्यानें आह्मांसही येथें ठेवणें ठीक नाहीं. दोन खेडीं इकडील आहेत तेंही राहणें संकट. त्या अर्थी जे सलाह तेथील मंडळीचे विचारें ठरेल तें करावें. राजश्री भाऊचें पत्र घेऊन पाठविलें आहे, त्यावरून सविस्तर श्रुत होईल. राजकी वर्तमान पेशजी सेवेसी विनंति लिहिली आहे त्यावरून साकल्यार्थ ध्यानारूढ होईल. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.
पौ। छ. २८ जिल्हेज, मु॥ झांशी, रविवार.