[ ३४० ]
श्री १६७७ शके ज्येष्ठ अधिक वद्य.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री दामोधरपंत स्वामी गोसावी यांसीः--
पोष्य महिपतराव आवजी दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे. विशेष. पत्रें दोन पाठविलीं ती पावली. ममतेचा व स्नेहाचा अर्थ लिहिला तो कळला. ऐसियास, तुमचा आमचा स्नेह परमेश्वर कृपेनें घडला तो कांहीं लोकजनिक होता ऐसें नाहीं. त्याच प्रकारें ममतायुक्त चालला. परंतु कालपरत्वें आपलेजवळ ह्या गोष्टीची भ्रांत पडली. ऐसें आमच्या दृष्टीस, पडल्यासही जें आपलें हित चि स्नेहाचे रीतीनें गतवर्षी सांगत गेलों. व बाळाजीपंत व हरिचंद्रपंत पांजबरोबर सांगोन लेहुन पाठविलें होतें, त्याचा प्रत्ययतुह्मांस आलाच असेल. आह्मांस तो आला. असो ! तुह्मीं सर्व जाणता आणि वकील अहां. ज्यांत आपलें कल्याण व मेळविल्या दौलतीचें रक्षण राखोन राहाणें हेंच शहाणपण. कोठेंही खुशाल असावें हेंच खबर आह्मांस पाहिजे. पुढें मनसुबा विचार कर्तव्यता काय कशी तो अर्थ कोणी वराड आलिया स्पष्ट लिहून पाठवावा. सारांश, श्रीमंत तुमचे मूळद्रव्य, त्यास येथून दादाबज्या हेच. ऐसें असतां त्याजसी नाखुषी जाहाली. तेव्हां येथील अर्थ व परिणाम कसा काय त्याचा स्पष्टार्थ श्रीमंताचे पुरवणींत आहेच. येथून ल्याहावासा नाहीं. येथील लक्ष तुटल्यानीं उत्तमांत नाहीं. तुह्मी जो विचार करणें तो पुरताच केला असेल. विशेष काय लिहिणें ? हे विनंति.
पै॥ छ १८ रमजान