[ ३३७ ]
श्री
शके १६७६.
श्रीमंत राजश्री पंत स्वामीचे सेवेसी :--
विनंति सेवक आज्ञाधारक शिवजी नाईक अणजूरकर सरपाटील सेवेसी विज्ञापना. ता। छ. शाबानपावेतों स्वामीचे कृपावलोकनेकरून सेवकांचे व प्रांतमजकूरचें वर्तमान यथास्थित असे. बहुत दिवस जाले, परंतु लेखणआज्ञा करूवून सेवकाचा परामृष न केला. रा। बाबाजी नाईक यांसी कैलासवास जाला. सेवकाचें समाधान पत्रीं करावें तेंहि समर्थांहीं न केलें. विशेष :– गनीमाची बातमी तरी : वलंदेजाचीं हुपरगाणें नव आलीं आहेत. चार मुंबैचे बार्यावर आहेत. पांच महासमुद्रांत नाटी आहेत. चार बार्यावर आहेत. त्याजमध्यें शिपाई भांडायाचें सामान आहे. हजार दीड हजार माणूस आहे. आणीक चाळीस गलबतें मागें येणार. त्यास फतीमारी रवाना केली आहे. मागोन फिरंगीहि येणार, ऐशी खबर मुंबैस दाट आहे. कोण्ही कोण्हाजवळ बोलत नाहीं. अंतस्थें गुळमुळ आहे. फिरंगी दोघे मुंबैस आहेत. त्यांस खर्चवेंच गोव्याहून येतो. त्यास, मुंबैस फिरंगी आहेत त्यांणी दोन गुराबा बांधिल्या. त्याजपैकी एक पाण्यांत लोटली. एक लोटावयाची आहे. गोव्यास दोघे विजुरेल आहेत; ते उंचे रक्ताचे आहेत. त्यांजवर पाशाचा यखत्यार आहे. त्यांनी केलें तें पातशास प्रमाण आहे. सारांश दिसोन येतें कीं, फिरंग्याचें, वलंदेजाचें एकसूत्र आहे, ऐसी माव दिसतें. ऐसें असोन येथील अमलदार रा। रामाजीपंत हजूर बोलाविले. रा। रामाजीपंत यांचा नफ्त टोपीकरावर बरा आहे. मौजे मुर्धे येथील भांडणांत व पाणबुरुजावर फिरंगी आला होता ते समयींही हेंच पुढें होऊन गनीम परामविला. साष्टींत उतरतां सेवकाचे पाठीवर हेच धारिष्ट करून आले, ह्मणून कार्यसिद्धी जाली ! नाहीं तरी वसईसारिखें होतें. मग उपाय न होता ! परंतु, स्वामीचे प्रतापेंकरून सर्व सिद्धीतें पावलें. हालीं शकट वोडवळ आहे, ऐसें सेवकास दिसोन येतें. याजकरितां खामींनीं रा। रामाजीपंतांस सरंजाम देऊन फौजेसुद्धां आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत. गनीम भाद्रपद आश्विन या दोहो मासांत, येणार तरी येईल. पुढें न ये. त्यास राउतांचें भय आहे, ऐसें वर्तमान तेथें आहे. स्वामीचा प्रताप भूमंडळी भरून उरला आहे, हा सेवकास भरवसा आहे. वरकड गनीमाची माव खरीच असे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञप्ति.