[ ३३६ ]
श्रीशंकर.
१६७६.
श्रीमत महाराज मातुश्री आई साहेबाचे सेवेशीः--
विनंति सेवक बाळाजी बाजीराव प्रधान विज्ञापना. येथील कुशल तागाईत छ. १६ रमजानपर्यंत साहेबाचे कृपेंकरून वर्तमान यथास्थित असों. विशेष. साहेबाचे सेवेसी विनंतीपत्रें सेवकांनी पाठविलीं होती. ता।वार यादबंदी कलमवार लिहून पाठविलीं ती पावली. त्याचे जाबसाल पुरवणी पत्री सेवेशी लिहिले आहेत. त्याजवरून विदित होईल. पत्री आज्ञा की साहेबच पुणियास लौकरच येणार. त्यास, फौजांनी कूच करून जावें ह्मणून आज्ञा. त्यास, साहेबांचा निघावयाचा मुहूर्तनिश्चय जाला, ह्मणजे तेथें राजश्री तुकोजी शिंदे आहेत त्यांस आज्ञा करावी. साहेब निघणार. त्याचे पूर्व दिवशीं तमाम फौजा कुच करून पूर्वेस्थलीं जाऊन राहतील. दक्षणेकडे फौज आहे तीही कुच करून तिकडेच यावयाची सोई पाहून सरून राहील. साहेबाचे आज्ञेप्रमाणें तुकोजी शिंदे वगैरे साहेबांबरोबर येतील. याउपरि लटके कुतर्क संशय साहेबीं किमपि चित्तांत न आणावे. साहेबांचे पायांखेरीज व मर्जीपेक्षां सेवकास कांहीं अधिकोत्तर नाहीं. कैलासवासी शाहूमहाराजांहीं सेवकांस वाढविलें राज्य भाराची यख्तियार ठेविला. सेवकांविषई त्यासमईं वाईट बरें सांगणार सांगत होते. परंतु चित्तांत किमपि संशय न आणितां अधिकोत्तर कृपाच करीत होते. सेवकानेंही निष्टेनें सेवा केली व करित आहों. त्याचप्रकारें चित्ताची निर्मलता करून राज्याचे बंदोबस्ताचा आखतीयार सेवकावर ठेवून कृपा करून सेवकाचें समाधान केल्यास सेवकही चित्तांतील संशय असतील ते अर्ज करून दूर करून घेईल. एकमतें करून राज्याचा बंदोबस्त जाल्यास जनाचें कल्याण होऊन, सिंव्हासनास शोभा येऊन, सेवक लोकांचे सेवेचें सार्थक होईल. सेवकाकडील कारकुनास समक्ष नेऊन कृपापूर्वक सेवकाची विनंति श्रवण करावी. सत्वर कृपा करावी. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.