[ ३२१ ]
श्री शके १६७६ मार्गशीर्ष वद्य ७.
राजश्री दामोधर माहादेव गोसावी यांसीः-
उपरि. तुह्मी चिटी व समसमाद्दौलाचीं तीन पत्रे पाठविली ते पावलीं. लिहिलें कीं समसामद्दौला मात्र च्यारबागानजीक येतील. व समसामास तर बरेंच वाटत नाहीं ह्मणून विस्तारें लिहिलें. ऐशास, मुख्य आधीं हें उभयता येऊन, यांची खातरजमा एकांती लोकांतीं केलिया वाचून नीट होणेंच नाहीं. याचि अन्वयें प्राथःकालींच तुह्मांस चिटी लिहिली आहे त्यावरून कळलेच असेल. सारांश, दोघे येऊन एकांती याची खातरजमा करतील तेव्हां हा येईल. याचा विचार तरः-- तुह्मी जाहिराना पत्रें समसामदौलाची पाठविली त्यांत निशेचा मजकूर कळतच आहे. परमारें खानखाना व समसामद्दौला यास पत्र पाठवून अगर कोणी मायेचा असेल तो पाठवून अंतस्त निशा करून जातील. तदौत्तर त्यांणी येऊन लष्करांतून घेऊन जावें. हा प्रकार जाल्यावाचून याची निशा कसी पडेल ? आह्मी त्याजवरी जुलूम कसा करावा ? हे गोष्टी होत नाही तरी मग लाहोरास जावयाची तजवीज. खिलत पाठवून द्यावा. कांहीं फौज देऊन कुरुक्षेत्रीं पावते करूं ह्मणजे आमचा जिमा पुरला जाला. हेंहि न होये तरी सहजेंच सर्व गोष्टी राहीलियानें ईश्वरें नेमिलें असेल तें होईल ! आमच्या तो चित्तापासून हर प्रकारीं तोड जोड व्हावी. याचप्रमाणे गंगोबा, सुभेदार,
आदिकरून सर्वांचें मानस आहे कीं अतःपर निकाल पडेल तर उत्तम आहे, नाहीं तर शेवटीं जें होणार तें होईल. ऐसें आहे. तुह्मी वरचेवरी लिहतां. परंतु ज्यांत गोष्ट पसंदीस पडे, शाहाण्याची निशा होये, ऐसें करण्यांत येत नाही. याउपरि उत्तम असेल तो विचार करणें. कदाचित् येथून दौलतरायासही पाठवावेंसें तुमचे विचारें आलें तरी ह्याच गोष्टी पष्ट पुसोन घेईल. याचा विचार करून उत्तर नित्याप्रा। पाठवणें. त्याप्रमाणें केलें जाईल. जाणिजे. छ. २१ सफर. बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.