[ ३२० ]
श्री शके १६७६ मार्गशीर्ष वद्य ७.
राजश्री दामोदर महादेव गोसांवी यांसी :--
उपरि. तुमची चिठी पावली. वजीरांचे मानस कीं :– खानरवाना समागमें आह्मीं आपली फौज कुरुक्षेत्रपर्यंतही न द्यावी. व त्याचा अंमल लाहोरांत न व्हावा. तेव्हां लाहोर धातुपोषण मात्र द्यावें. ती गोष्ट आह्मीं उघडी न करितां येथेंच वजिरांनी खानखानास समजावून न्यावा ह्मणजे मग पुढें सहज चालेल. प्रस्तुतपुर्ता विश्वास पुरून शहरांत गेला ह्मणजे गुंता उरकला. आह्मी वजीराचा सलुख चित्तापासूनच चाहातों. अकस्मात् तर ही गोष्ट प्राप्त झाली ! मातबर मातबराचा लेंक घरी येऊन बसला. तेव्हां कांहीं तो त्याची सोय केली पाहिजे. ह्मणून हे दोन पर्याय आह्मीं ह्मणतों. वजीर, फौजही आमची, तिकडे कुरुक्षेत्रपर्यंत जावयास राजी नाहींत व निखालस समजावीस खानखान याची करीत नाहीत. तेव्हां तिसरी गोष्ट खान खानसमागमें आमचे राहील. वजिराचा आमचा स्नेह करारमदार ठरला आहे तो आहेच. त्यांत त्यांनी अंतराय न करावा. खानखानास घेऊन आह्मीं गंगास्नान करून जयनगरावरून देशास जाऊं. वजीरांनीं एतद्विषयीं चित्तांत वसवास न घरावा. आह्मीं त्याचा स्नेहच हा काळवर राखिला व पुढें चित्तापासून राखणार. खानखाना आह्मासमागमें राहिल्यास वजीरांनीं वसवसा किमपि न धरावा. आह्मीं स्नेह धरितों त्याप्रमाणेंच त्यांनीं धरावा. मामलत केली आहे त्याप्रमाणें रुपया आमचा द्यावा हें विहित आहे. राजश्री दौलतराव मुरार हाच मजकूर शेवटची गोष्ट पुसावयासी पाठविले आहेत. तरी सालजाब करून मानिल्हेस माघारें लवकर पाठविणें. रुपया पहिले मामलतीप्रमाणें देतात किंवा कांहीं संशय धरितात हें साफ लिहिणें. त्याप्रमाणें पुढें जें कर्तव्य तें करूं. बहुत काय लिहिणें ! रा। छ २१ सफर. प्रातःकाल. लेखनसीमा.