[ २९५ ]
श्री शके १६७६ वैशाख शुद्ध ३.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री दादो महादेव गोसावी यांसिः-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सु॥ अर्बा खमसैन मया व अलफ. कान्होजी मोहिते यांणी वसंतगडास राहून मुलकांत नानाप्रकारें लूट धामधूम केली. कितेक ब्राह्मण नागविले. ती त्याची वर्तणूक जगप्रसिद्ध आहे. प्रस्तुत वसंतगड राजश्री यमाजीपंत यांनी घेतला. तुमचा आश्रा कान्होजी मोहिते यांनी केला. त्याजवरून तुह्मी यमाजीपंतासी विरुद्धास्पद वर्तता. ह्मणोन कळलें. तरी हे गोष्ट काय कामाची ? कान्होजी मोहिते बदफैली होते. त्याचें पारपत्य यमाजीपंतांनी केलें. ते तुह्मी संतोषच मानोन, ते व तुह्मी एके विचारे चालोन, आज्ञेप्रमाणें वर्तणूक करावी, युक्त असतां, तुह्मीच आपल्यांत आपण वाईट दाखवूं लागल्यास पुढें योजिलें कार्य आज्ञेप्रमाणें सिद्धीस जाणें कळतच आहे ! ऐसी गोष्ट नसावी. सहसा तुह्मी न करणें. कदाचित् कारभार संमंधे यमाजीपंताकडे अंतर असिलें तर अंतराचे कलमाची याद हुजूर पाठवून द्यावी. येविशीची आज्ञा करणें ते त्यास करून, अंतरें दूर केली जातील. ते गोष्ट तुह्मीं एकीकडे ठेऊन, तेथील तेथें विरुद्ध दाखवितां, ते एकंदर न दाखवणें. आज्ञेप्रमाणें एकरूप राहून आज्ञेप्रमाणें कार्यभाग करणें. वर्तमान लिहीत जाणें. खासा स्वारी अविलंबेंच त्याप्रांतें येत असे. तेही भेटीस येतील. तुह्मीं याल. जें सांगणे तें सांगितलें जाईल. तावत्काल पहिलेप्रों। ऐक्य तेनें राहून कामकान करीत जावें. कानोजी मोहिते यास न ठेवणें. वरचेवर सर्व वर्तमान लिहीत जाणें. हिसेब वसूल वसुलाचे तयार करून ठेवणें. छ. १ रज्जब. बहुत काय लिहिणें ?
लेखन
सीमा.