[ २८२ ]
श्री शके १६७५ चैत्र-वैशाख.
राजाश्रयावराजित राजमान्य राजश्री बापूजीपंत व राजश्री पुरुषोत्तमपंत नाना स्वामीचे सेवेसीः-
पो। अंताजी माणकेश्वर साष्टांग नमस्कार विनंति उपरि. आह्मास नबाब वजीर यानें दहा लाख रुपये देऊन आपणाकडेस घेऊन जावयासी करार केलें. त्याजवरून आह्मीं तुह्मास सांगितले. तुह्मीं साफ सांगितलें जे, दहा लाख कामाचे नाहीत, यांत श्रीमंताचें नुकसान आहे, तरी त्याचा पैका टाकून पातशाहाचे चाकरीस आमचे आज्ञेप्रमाणें एकनिष्ठ राहणें. त्याजवरून आपण मान्य केलें. अतःपर नबाब वजीर आह्मास पंचवीस लाख रुपये देईल तरी आपण नबाब वजीराकडे जाणार नाहीं. जेथें तुह्मीं पातशहाची एकनिष्ठ चाकरी सांगाल त्याप्रमाणें करून. त्यांत अंतर करणार नाहीं. बहुत काय लिहिणें ? कृपा असो दीजे हे विनंति. मिति शके १६७५ श्रीमुखनाम संवत्सरे. हे विनंति. सु॥ सलास खमसेन मया व अलफ. तुह्मीं आह्माशीं पातशहाच्या घरच्या व हरएक कामांत तफावत सर्वथा न करावी व आमच्या मानांत उणें न करावें. हे विनंति.