[ २७४ ]
श्री. शके १६७४ फाल्गुन वद्य २.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बापूजीपंत व राजश्री पुरुषोत्तमपंत स्वामीचे सेवेसीः---
पो। अंताजी माणकेश्वर सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. आह्मांस उभयतासरदारांनीं पातशाहाचे चाकरीस दिल्लीस पाठविलें. फौज अडीच हजार. आह्मी ग्वालियेर प्रांतास आलों. तेव्हां तुमचीं पत्रें दोन चार आलीं की, नवाब वजीर यानें नवाब बाहादर मारिला. पुढें पातशाहासी दगाबाजी करणार. याजकरितां आह्मांस पातशाहांनी बोलावून सांगितले कीं, तुमची फौज पांच हजार सत्वर बोलावणें. आह्मी अर्ज केला कीं, फौज ग्वालियेरींत आली. पातशाहांनी रागें भरून सांगितले की, फौज थोडी आहे, कराराप्रों पांच हजार फौजेनसीं आपले सरदार चाकरीस बोलावणें, उणी फौज आली तरी कार्यास येणार नाहीं. करारांत अंतर नसावें. या प्रा। आज्ञा केली. तरी तुह्मी दुसरी नवी मर्हाठी फौज अडीच हजार ठेवणें व पहिली अडीच हजार एकूण पांच हजारानसीं सत्वर येऊन पोहोंचणें. त्याजवरून आह्मी नवी फौज ठेविली. स्वार १५०० दीड हजार व कदीम फौज अडीच हजार एकूण च्यार हजार फौजेनसीं तुह्मांजवळ चाकरीस आलों. साहा महिने तुमचे आज्ञेप्रमाणें पातशाहाची चाकरी करून पातशाहाही राजी राखिले. अडीच हजार फौजेची नेमणूक माहे पुर्णिमापरियंत होती. त्याप्रमाणें तुह्मी पैका दिल्हा. पुढें अडीच हजार फौजेस दरमाह रोजमुरा पहिल्याप्रमाणें, दरमाहे रुपये तीस हजार, एकूण पांच माहीं रुपये १,५०,००० दीड लाख, नवी फौज दीड हजार, त्याचे रुपये तीन लाख, एकूण साडेच्यार लाख रुपये आह्मास पाहिजेत. तेव्हां तुह्मांस सांगितले कीं, आह्मांस ठेवणें तरी साडे च्यार लाख रुपये देणें, नाहीं तरी खावंदाकडे जाण्यासी निरोप देणे. त्यासी, तुह्मी सांगितले की, तुह्मी श्रीमंताचे सरदार, पातशहाचे चाकरीस तुह्मास पाठविले, आणि विनाखावंदाची आज्ञा व पातशाहीची रुकसतीशिवाय जाणें उत्तम नाहीं, पातशाहाचीच चाकरी करणें अथवा सरदार लिहितील तेव्हां जाणें. सहरहू साडेचार लाख रुपये आह्मी तुह्मास सरकारचेऐवजी क्षेपनिक्षेप देतों, श्रीमंताचे फौजेनें चाकरी पातशाहाची केली ती श्रीमंतांची जाली, चिंता काय ? साडेच्यार लाख रुपये घेऊन पातशाहा सांगतील त्याप्रों। चाकरी करणें, ह्मणजे श्रीमंताचा नक्षा होतो. त्याजवरून आपण कबूल केलें, ज्याप्रों। चाकरी तुह्मी सांगाल त्याप्रमाणें करून खाविंदाचा व वडिलांचा लौकिक राखून पातशाहा वगैरे यांजपासून बहुमान मनसबा जागिर, व इनामगांवे. वगैरे तुमचा यत्न जेथवर इमाना प्रों। होईल तेथवरी करून घ्यावें, आह्मी तुमचे मर्जीप्रा। चालावें. हरयेक विशयीं तुह्मा आह्मांत याउपरि प्रतरणा कामाची नाहीं. जें तुमचें बरें तें आमचें बरें. आमचें बरें तें तुमचें बरें. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ असो दीजे. हे विनंति. छ. १५ जमादिलावल, सु॥ सलास खमसैन मया व अलफ.