[ २४३ ]
श्री
शके १६७३.
राजश्री गोविंदराव गोसावी यांसिः-
आशीर्वाद उपरी. जिउबारायाजी एकनिष्ट होते त्या आलीकडे सर्व दरबारचें मुदसदी एकप्रकारचे जाणून सर्वप्रकारे तुह्मासच हातीं धरून बरा वाईट सवालजाब तुमचे हातून केला. तुह्मी यथाशक्ती आमचें कार्यास न चुकलेस. गत वर्षी यमाजीपंतांनीं भर देऊन सकवारबाई तुमचे केवल पाठीसच लाविली, ते प्रसंगी तुमचें दरवारीं कांहीं चालेना. तथापि तुह्मामुळें सकवारबाईचा दावा. सर्व ब्राह्मणांचा पेच कबूल करून तुमचीं मुलेंमाणसें पुण्यांत आणून ठेविलीं. तुह्मा रक्षावयास फौज दिली. तुह्मामुळें आह्मावर सकवारबाईनीं इतराजी, त्याचा काळ होय तों, कशी केली, हें तुह्मांस स्मरण असेलच. तुह्मी यमाजीपंताचें पेचामुळें, सकवारबाईचे पेचामुळें गडकरी सर्वप्रकारें आपले विचारांत घेऊन आमचा आश्रय केलात. आह्मीही तोच विचार शेवटपोवतों निभावला. तोंपावेतों आमचे चित्तांत तुमचेठाई ममतेस अंतर नव्हते. ज्याप्रमाणें बाबांचे चित्तांत तुमचा पक्ष त्याचप्रकारें आमचें चित्तांत. कां कीं तुमची बाबांचे ठाई निष्ठा तशीच आमचे ठाई. तदोत्तर राजश्री स्वामींनीं की तुह्मास लिहून त्यांस लिहून जवा बसे तें करावें, तेंही न करतां उफराटें राज्यभारास युक्त आह्मांस समत, तुमचें हित, ऐसा विचार अवलंबिला असतां ठाकून लांबणीवर घालून बसलेत. तुह्मास काय ह्मणावें ? एक, बाबूजी नाईक, देवराव यांचा दरबारी आह्मी अभिमान धरला, वेडेपणें अथवा शहाणपणें. तेवढेच तुह्मी व बाबांनी तटी लाऊन राज्य बुडविलेंत, व आमचें घर बुडविलेंत, या शहाणपणास काय ह्मणावें ? कलयुगांत खावंद तो वेडेच असतात. परंतु कार्यकर्ते शाहणे असतात, ऐसें ऐकत होतों, तेही येथे विपरीत दिसोन आलें. अद्यापही दुराग्रह टोकाल, विचारावर घ्याल, तर आमचा लौकिक राहील, राज्य वाचेल. येणेंप्रमाणें केलीया तुमचेही बरें होईल. याउपरी मनापासून आईसाहेबांस समजाऊन, भरंवसा पुरऊन, खालीं आणावी. नानांनीं तुह्मी मिळोन राजकार्य चालवावें. आज नासरजंग मेला. अशा प्रसंगांत तो मोठासा मनसबा केला पाहिजे. बाबा रागीट उठोन गेले. त्यास आमचा लौकिक मात्र जाहाला. परंतु थोडक्याच मजकुरावर आज एक वर्ष दुराग्रह वाढऊन या थरास आणिलें. आतां तरी विचार करून, समयसूचकता कराल तर सर्व कुशल होईल, नाहीं तर ईश्वर प्रमाण ! आशीर्वाद.