श्री
शके १६७३
सेवेसी कृतानेक विज्ञापना. वरकड वर्तमान थोरल्या पत्रीं लिहिलें आहे, त्यावरून कळेल. मातुश्री आईसाहेबाची भेटी उदईक होईल. आमचें येणें जालें. त्यास, इकडील मजकूर मनास आणतां बातमी ब्राह्मणमुखें ऐकिली. यशवंतरायाचें राजकारण येथें आहे. येथें स्वयाती लोक त्याचे आहेत, त्यांकडून आहे, ऐसें एका गृहस्थानें सांगितलें. अठल्याबद्दल कजिया पडला आहे. राजश्री फारसे प्रतिपक्ष बाबद भटाचा धरितात. बाईकडून अगत्यवाद फार आहे. दुसरें वर्तमान ऐसें ऐकिलें:--श्रीमंत राजश्री नानासाहेब राजश्रीस आपल्या लस्करास न्यावें, या निमित्य नारो व्यंकटेश नामें कोणी आहे, तो पाठविला आहे. तो राजश्रीसी निराळेंच बोलतो. ऐसें वर्तमान बोलतो. श्रीमंताकडून आमचे नांवे येथें राजश्रीस पत्र आलें ह्मणजे ग्रास पुर्ताच हाती लागेल. कळावें. भगतीबाद श्रीमंत भाऊसाहेबाचे ठाई आहे, ऐसें भाषणांतच दिसलें कीं, आह्मांस दर्शन जालें व एकांतीहि पुसिलें कीं, सदाशिवपंत खुशाल आहेत कीं ? आह्मी विनंति केली, स्वामीच्या प्रतापें खुशाल आहेत. राजश्री भाऊकडून राजकारणाचा जिवाळा राजश्री तात्याकडील येथें आहे. कळावें. पत्र वाचून फाडून टाकावें. आह्मांसहि जे काय आज्ञा होईल, ती लिहिली पाहिजे. हे विनंति.