श्री शके १६७३ पौष शुद्ध १५
पो। छ १४ मोहरम पांच घटका रात्र.
श्रीमंत महाराज मातुश्री आईसाहेबाचे सेवेसी :-
विनंति सेवक बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना. ता। छ १३ मोहरम मु॥ हागेपळवे, पर्यंत साहेबाचे कृपावलोकनेंकरून यथास्थित असे. विनंति. साहेबीं आज्ञापत्र सादर केलें तेथें आज्ञा जे: मोगलाची दाटी जाली, याजकरितां तुह्मीं मोगलांवरी गेला. राजश्री जगजीवन पंडित प्रतिनिधी यांस इकडे रवाना केलें. हें वर्तमान राजश्री मोरो शिवदेव व विठ्ठल बयाजी यांणीं लि॥. त्याजवरून पंडित मशारनिल्हे तुह्मांबरोबर राहण्याची आज्ञा केली असे. व वरकड सरदारांस आज्ञापत्रें सादर केलीं आहेत. तुह्मांस सामील होतील. अविंधाचा पराजय करून तुह्मीं हुजूर येणें. तुह्मांवरी साहेबाची कृपा पूर्ण आहे ह्मणोन आज्ञा. त्यांस, प्रतिनिधीबरोबर फौज नाहीं व साहेबासंनिधही या समयांत मातबर मनुष्य असले पाहिजेत. यांजकरितां प्रतिनिधीस हुजूर नेऊन तेथील बंदोबस्त करावा. सरदार सर्वांस सामील सेवकास व्हावें ह्मणोन पत्रें पाठविलीं ती उत्तम आहेत. सरदार जलदीनें फौजेनसी सेवकास सामील होत ते करणार साहेब धणी आहेत. साहेबाचा पुण्यप्रताप सेवकाचे मस्तकी असतां कोणेविसी मोगलाचा ठर धरीत नाहीं. जे होणे ते धन्याचे प्रतापेंकरून होईल. सेवेशीं श्रुत होय. हे विज्ञापना.