श्री शके १६७३ पौष शुद्ध १२
राजश्री बळवंतराव व गणपतराव स्वामी गोसावी यासी :-
विनंति. सदाशिव चिमणाजी नमस्कार. नानाची पत्रें पाठविली ती पावलीं. सर्व कळलें. तुह्मी लिहिलें तेंहि कळलें. ऐशियास, याचें उत्तरें सविस्तर लिहिली आहेत, त्याप्रों। नानांनी करावें. गोविंदरायांनी सुखरुप राहून करावें. लौकर हरएक काम फेंदी न पाडतां केलें असें करणें. तरच नानाचें दरबारी वजन. वरकड तेथें नाना राहिले ह्मणोन बाबाचे मनापासून पेच नाही. तरी सुखरूप राहून करणें. एकूण फेंदी पडलिया येथें नानाजवळहि हजार प्रकारचे संदेह पडतील यास्तव लौकर करावें. सविस्तर तेथील भाव नानापासून मला लिहून पाठवित जाणें. बाबाचा रंग पडे असा करून पाहतों. रा। छ १० सफर दोनप्रहर हे विनंति. यांच्यानें राजे खालीं किती रोजांत उतरतात ? किंवा आह्मी लिहितों याची नानास लबाडीच वाटून उगेंच राहतां ते हें लिहिणें, ताराबाईने बंड उभे केलें, तें मोडून उतरावें; व हरएक मनसुबा एक होऊन बाबांनीं नानांनी करावा, असें होते, बोलेला. वरकड खावंद आहेत. चित्तास येईल तें करतात ! नानांनी माझा संदेह बाळगूं नये. गोविंदरायाचें समाधान करून याप्रों। लौकर निदर्शनास आणून उतरणें हें उत्तम आहे. आमचा संदेहच पडत असला, तरी उत्तम आहे. तसेंच लिहिणें. हे विनंति.