श्री शके १६७३ मार्गशीर्ष वद्य ९
श्रियासह चिरंजीव राजश्री तात्यास. प्रती पुरुषोत्तम माहादेव आशीर्वाद उपरि येथील कुशल मार्गेश्वर वद्य ९ मु॥ गंगातीर अंतरवेद जाणून स्वक्षेम लिहिणें. विशेष. येथील वर्तनान पूर्वी तीर्थरूप राजश्री दादाहीं मुजरद जोडी पाठविली, लिहिलें आहे, त्यावरून विदित होईल. सांप्रतचें वर्तमान पठाण रोहिले आपले मुलकांतून पळाले. फौजा वजिराच्या व आपले सरदारांच्या त्याचे मुलकांत गेल्या. तमाम मुलुख पळाला. आपली ठाणी बसवितील. ईश्वरें महद्यश यांस दिले. आपणा उभयेतासमागमेंच लस्कराबराबर आलों. दादा वजिराबा।र, आह्मीं सरदारांबा।र आहो. एके जागाही सत्वरीच होतील. तीर्थरूप राजश्री बापू दिल्लीस सुखरूप असेत. तुह्मीं त्या प्रांतीचे सविस्तर वर्तमान वरचेवर लिहून पाठवावें. गुजराथचें काय जालें ? रुपये गुंतोन पडले. अमल बसतां दिसत नाहीं. श्रीमंतांचे प्रतापें सर्व उत्तमच होईलच. सावकाराचे रुपये घेऊन दिले हे चिंता लागली आहे. सविस्तर लिहून पाठवावें. विशेष. रा॥ राघोबा हिंगणे याचे रुपये १६५० सोळासे पनास येथें दिल्हे आहेत. तुह्मीं ती॥ राजश्री चिंतामण बापूस देऊन पावल्याचें उत्तर पाठवावें. राघोबा आह्मांजवळ सुखरूप आहेत. त्यांहीं पत्र लिहिलें त्याजवरून कळों येईल. बहुत काय लिहिणें ? तुह्मीं सदैव कुशल वृत्त लिहीत जाणें. भेट होईल तो सुदिन. हे आशीर्वाद. हे रुपये लिहिल्याप्रों। ती॥ बापूस प्रविष्ट करणें. कर्जाचे रुपये चिरंजीव राघोबाकडे आपले पहिले रु॥ आहेत. कदाचित् या ऐवजांत हेच घ्याल तर न घेणें. ते रुपये पुढें देतील. यास्तव हे रु॥ जरूर खर्चास बापूचे हवाला करून रसीद पाठवणें. हे आशीर्वाद.
पौ चैत्र वद्य ८.