श्री शके १६७३ मार्गशीर्ष वद्य ५
पौ। छ० २२ मोहरम
श्रीमत् माहाराज मातुश्री आईसाहेबांचे सेवेसी :-
विनंति सेवक बाळाजी बाजीराज प्रधान कृतानेक विज्ञापना. सेवकाचें वर्तमान ता। छ० १८ मोहरम मु॥ घोडनदीनजीक मलठणपर्यंत साहेबांचे कृपावलोकनेंकरून यथास्थित असें, विनंति. साहेबीं कृपा करून आज्ञापत्र सादर केलें. तेथें आज्ञा जे, राजश्री यशवंतराव दाभाडे सेनापति व सेनाखासखेल येथें आले नाहीं. तुह्मीं किमपी संशय न धरणें. तुह्मांस निमे गुजराथ दिल्ही ते दिल्ही. शत्रु आला, त्याच्या पराभवास्तव व सरदारांस सामील व्हावयाविशीं पत्रें हुजरे पाठविलीं आहेत. ह्मणोन आज्ञा. ऐसियासी, साहेब धणी कृपापुरःसर आज्ञा केली असतां, सेनापतीचा संशय छोट्या सरकारास होईल. सेनापति हुजूर जाते, तर्ही साहेब ताकीदच करितील. निशा आहे. मोगल जवळ्यापुढें गुणोरियावर कुकर्डाचे कडेस मुकामास आला. सेवकाच्या फौजा मोंगलाभवत्या लागल्या आहेत. नित्य झीटपीट होते. दहावीस घोडीं, शेंपन्नास बैल, आणितात. मोगल दोन कोस चालतो. साहेबाचा पुण्यप्रताप समर्थ आहे. तद्योगें शत्रूचा पराभव होणें तो होईल. सेवकास सामील व्हावयाविशीं सरदारांस साहेबी आज्ञापत्रें सादर केलीं, उत्तम आहे ! जलदीनें सामील होत तें करावें. तर साहेब धणी आहेत. एकाएकी मोगलानें दगाबाजीचा प्रसंग केला. हा समय सेवकाचे केवळ अबरूवर आहे. सेवकाची अबरू गेलिया मग राज्याची अबरू राहणार नाही, हा अर्थ सर्व साहेब जाणतात. तथापि अमर्यादा करून लिहिलें, याची क्षमा करून सर्व प्रकारें साहित्य केलें पाहिजे. हे विज्ञापना.