श्री शके १६७३ श्रावण शुद्ध १३
नकलेची नकल.
राजश्री गोविंदराव चिटणीस गोसावी यांसी.
छ सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। दमाजीराव गायकवाड सेनाखासखेल रामराम विनंति उपरि येथील कुशल ता। छ ११ रमजान पावेतों मुकाम नवसरी येथें जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. आपणाकडून पत्र येऊन साकल्य श्रुत जालें. रावसाहेब आपण आमचेविसीं श्रीमंत छत्रपतीजवळ बहुत श्रम करून महाराज वर्तमान असतां, आमची रवानगी गुजराथ प्रांतीं आपण केली ह्मणून आलों. मागें महाराजांनी कैलासवास केला चिरंजीव राजश्री फत्तेसिंगराव व मानाजीराव व गोविंदराव यांस आपले घरी ठेवून बरदास्त करून सर्व प्रकारें सांभाळ केला, आणि सरकारचे देण्याचा हवाला घेतला. प्रतिबंधापासून मुक्त करविलें. ते रुपये आपल्यास पाठविण्याविसी चिरंजिवाकडून लिहिलें आलें. त्यासी तजवीज करून मागाहून पाठवूं. रावसाहेब चिरंजीवास मोकळे केले हा उपकार विसरणार नाही. आपली चिटणिसीची आसामी सरदारीबराबर वस्त्रें
आपले चिरंजीवाचे नांवे करून घेतली. त्याची तैनात सालीना रुपये २५,००० घरबैठे दरसाल पाववीत जाऊं आणि आपलेकडील कारकून दरखाचे कामावर येईल त्यास दरसाल रुपये ५,००० पांच हजार व पनास घोडीं पागेची त्यास वेतन दरसाल रुपये २१००० येकवीस हजार येकूण सालीना येकावन हजार देत जाऊं याशिवाय फंडफरमासजी मजकडून होईल त्यास अंतर करणार नाही. यास श्री कुळस्वामीवी शफत असे. आपण घरावू रीतीनें मुलाचा सांभाळ करिता. आमचे सरदारीची चिंता आपल्यास. हा सरदारी आपली जाणून तेथील बंदोबस्त ठेऊन वरचेवरी पत्रीं सांभाळीत जावें. विस्तारें काय लिहूं बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंति. मोर्तब.
पौ। छ १९ सवाल सु॥ इसजे खमसेन्न मया व अलफ. शके १६७३ १८०८
शिक्का.