श्री
शके १६७३ चैत्र
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोदरपंत दाजी स्वामीचे सेवेसीः--
पो। नारो शंकर सा। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल मु॥ दर्यावगंज जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. आह्मी आगरेयापासून पंधरा पंधरा कोसाच्या मजली लांब लांब करून येथपावेतों आलों. अद्यपि राजश्री मल्हाररायाचे लस्कराचा सुमार कळेना. त्यांचा मुकाम कोठें आहे ? पुढें कोणत्या रोकें जाणार ? त्यांच्या व तुमच्या लस्करास तफावत किती कोसाचा आहे ? हेंही कांहींच कळेना. सुभेदाराचे व वजिराचे लस्करास वीस पंचवीस कोसाचा तफावत ह्मणून ऐकितों. तथाप वर्तमान कांहीं आलें नाहीं. यास्तव स्वामीकडे राऊत रो। गुणाजी करकरे वगैरे पाठविले असत; तरी सविस्तर लिहिणें. उदईक वजिराचा मुकाम कोठे होईल हेंही लिहिणें. पठाणाकडील बातमी ठीक असेल तेंही लिहिणें. सुरजमल जाटाचा मुकाम पठारीचा आहे. स्वामीस कळावें, याकरितां लिहिलें. आपणाकडील वर्तमान सविस्तर लिहोन पाठवावें. बहूत काय लिहिणें ? कृपा असो दीजे. हे विनंति.