श्री
शके १६७३ चैत्र वद्य ४
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बापूजी बाजीराव गोसावी यांसीः-
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहित जाणें. विशेष. चिरंजीव राजश्री नानांनीं पत्रें छ. ६ जमादिलावलचीं सांडणीस्वारबा। पाठविलीं तीं छ. १६ मिनहूस पावली. गाईकवाड महारदर्यांत गेला. शाहारांत चौकीबंदी केली. बोलीचालीसहि रा। मल्हार गोविंद पाठविले. इकडून तुह्मी --- राजश्री गोविंदराव गेलेस तो कोंडल्यादाखल आहे. परंतु, तुमचे लोक युद्धास मन घालीत नाहींत या विचारें तुह्मी तहरहाचा निकाल काढाल, व तो कोंडला या अर्थे तोहि निकाल काढून जाईलसें वाटतें. परंतु तिकडे गाइकवाडांनीं सोखी केली; आपण मोंगलासी बिघाड न करावा, या विचारें सलुख केला; तिकडे येतो; गुंता नाहीं; ह्मणोन तुह्मांस लिहिलें. तीं पत्रें पावलीं नाहींत तों गाइकवाडास निरोप दिल्हा असाल तर दिल्ही. जरी पत्रें पावली असतील, तुह्मी निरोप दिल्हा नसेल; तर याउपरि निरोप न द्याल. दम धरून, त्याचें कबिलाबाड बंद करून, सिर्मिदा करणें; तों आह्मी येऊन पावतों. त्याजपासून दोनच गोष्टींचा निकाल करून घेणें आहे. तो विस्तार चिरंजीव नानाचे पत्रीं लिहिला आहे, त्याप्रमाणें तुह्मी करालच कराल. करणें. वर्तमान लिहित जाणें. चिरंजीव नानास विस्तारें लिहिलें आहे. तें, तुह्मी विचार करून कर्तव्य तें करीत जाणें. हे विनंति.