श्री
शक १६७३ चैत्र वद्य १
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बापूजी बाजीराव स्वामी गोसावी यासी :-
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जाणें. विशेष. तुह्मी व चिरंजीव राजश्री नाना-बराबरील फौज सारे एकदिल होऊन छ २७ रबिलाखरीं गायकवाडाशीं युद्ध केलें, गेंड्यापावेतों मोडून ताराज केलें, ह्मणोन विस्तारें चिरंजीव राजश्री नानांनीं सांडणी स्वारावर लिहून पाठविलें, तें पत्र आजी छ १२ जमादिलोवलीं पावलें. संतोष जाहाला. शाबास लोकांची व तुमची .. गाइकवाड वेणेवर आहे, तुह्मी कृष्णेवर आहां, ह्मणोन सांडणी स्वारांनी जबानीं सांगितले. ऐशास, राजश्री मानाजी पायगुडे व तात्याही तुम्हांजवळ येऊन पावलेच असतील. तुमची इबारत गाइकवाडावरी चढली. अतःपर गाइकवाडांस थोपून राखणें. आह्मी मजलदरमजल येत आहों. इकडील सर्व गुंते उरकले. मोगलाचा उत्तम प्रकारें सलुख जाहाला. आजी छ. १२ जमादिलोवली निजामकोंड्यावर मुकाम जोहाला. उदैक पुढें येतों. जोपर्यंत गाइकवाड वारापाणी जाहाला नाही, तों तुह्मी सारे गटून राहाणें. जोर पोहचल्या ताराज करणें. वर्तमान वरच्यावरी लिहित जाणें. * आह्मांस अलीकडे भरंवसा नव्हता. तथापि, तुह्मी, चिरंजीव नानांनीं हिमत बांधोन फिरोन त्याजवर सलाबत बसिविली, हे गोष्ट फार केली ! तुमचा वेढा पडलाच आहे, फिरोनहि जरबा द्याल, तेव्हां त्यास भारी पडेल, पळून जाईल, अगर लटकीफुटकी बोली तुह्मांसी लावील. त्यास तुह्मीं, चिरंजीव, मिळोन, नेट धरून, उत्तम प्रकारें कार्य करणें. आह्मीं लवकर येऊन पोहचतों. छ. १४ जमादिलोवल. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.